राज्यातील पोलिस भरतीला स्थगिती
मुंबई : राज्यात नोव्हेंबरमध्ये होणारी पोलिस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. राज्यभरात तब्बल १४ हजार ९५६ पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलिस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकतीच गृहखात्याची बैठक पार पडली होती. या बैठकीत राज्यात पोलिस शिपाई पदाची १४ हजार ९५६ पदे भरण्यात येणार असून, सर्वात जास्त जागा या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार आहेत. ६ हजार ७४० पदे मुंबई तर ७२० पदे पुणे शहरात भरली जाणार आहेत. मात्र, या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, याबाबत नाराज न होता तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.आज स्थगिती देण्यात आलेल्या भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली.
राज्य पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ०५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरपासून पोलिस भरतीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता होती. मात्र, आता ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस भरतीचे स्वप्न पाहणा-या तरुणांची पुन्हा निराशा झाली आहे.
मागील ३ वर्षांत पोलिस भरती झाली नव्हती. वयोमर्यादा संपल्याने अनेकजण पोलिस भरतीस पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, यासाठी वयोमर्यादा शिथिल केली जाऊ शकते. त्यामुळे ही पोलिस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचे समिती आणि सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढविली जाऊ शकते.
मुंबई : ६७४०, ठाणे शहर-५२१, पुणे शहर- ७२०, पिंपरी चिंचवड-२१६, मिरा भाईंदर-९८६, नागपूर शहर-३०८, नवी मुंबई-२०४, अमरावती शहर -२०, सोलापूर शहर-९८, लोहमार्ग मुंबई-६२०, ठाणे ग्रामीण -६८, रायगड-२७२, पालघर-२११, सिंधुदुर्ग-९९, रत्नागिरी-१३१, नाशिक ग्रामीण-४५४, अहमदनगर- १२९, धुळे -४२, कोल्हापूर-२४, पुणे ग्रामीण-५७९, सातारा-१४५, सोलापूर ग्रामीण-२६, औरंगाबाद ग्रामीण-३९, नांदेड- १५५, परभणी-७५, हिंगोली-२१, नागपूर ग्रामीण-१३२, भंडारा-६१, चंद्रपूर-१९४, वर्धा-९०, गडचिरोली -३४८, गोंदिया-१७२, अमरावती ग्रामीण-१५६, अकोला-३२७, बुलढाणा-५१, यवतमाळ -२४४, लोहमार्ग पुणे-१२४, लोहमार्ग औरंगाबाद -१५४, एकूण -१४,९५६
अनुसूचित जाती-१८११, अनुसूचित जमाती- १३५०, विमुक्त जाती (अ)-४२६, भटक्या जमाती (ब)-३७४, भटक्या जमाती (क)-४४३, भटक्या जमाती (ड)-२९२, विमुक्त मागास प्रवर्ग-२९२, इतर मागास वर्ग -२९२६ इडब्लूएस -१५४४, खुला-५४६८ जागा, एकूण : १४,९५६
