अष्टसहस्त्र पणत्यांनी उजळले शिवरायांचे अश्वारुढ स्मारक
पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, पुणेकरांनी केलेला श्री शिवछत्रपतींचा मर्दानी जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणा-या अष्टसहस्र पणत्यांच्या लखलखाटात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी दीपोत्सव साजरा झाला.
निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव २०२२, पर्व ११ चे. श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन शिवकालीन ऐतिहासिक स्वराज्यवीरांच्या वंशजांच्या, समितीच्या महिला भगिनींच्या व समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड व पदाधिका-यांच्या हस्ते झाले.
शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमूठ निर्माण करणा-या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पुर्ण केल्याबद्दल सरदार हिमंतबहाद्दर विठोजी चव्हाण, श्रीमंत सरदार गरुड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, श्रीमंत निंबाळकर घराणे, जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कावजी कोंढाळकर या स्वराज्यघराण्यांचा अखंड भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात आला.
अमित गायकवाड म्हणाले, शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे. सोहळ्याचे नियोजन समितीचे रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, गोपी पवार,प्रवीण गायकवाड, किरण शितोळे, मयूर दळवी यासह असंख्य स्वराज्य बांधवांनी केले.
