Sunday, October 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यातील पूर परिस्थितीवरून शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल


पुणे:पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील व्यवस्थेचाही बोजवारा उडाला. पुण्यातील पूरस्थितीवरून विरोधकांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आज सामना अग्रलेखातूनही पुण्यातील पुरस्थितीवरून भाजपच्या स्मार्टसिटी योजनेवर ताशेरे ओढत शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली. ‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे! अशा शब्दात भाजपच्या स्मार्टसिटी योजनेवर हल्लाबोल केला आहे.

पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती या आठवडय़ातील धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. सोमवारी पुण्यात दोन तासांत सुमारे 125 मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाण्या पळवाटांवरून ते पळ काढीत आहेत. पेठांमध्ये, तेथील घरे-दुकानांमध्ये शिरणारे पाणी, रस्त्यांना आलेले नद्यांचे स्वरूप आणि पाण्याच्या त्या वेगवान प्रवाहात वाहून जाणारी दुचाकी-चारचाकी वाहने हे चित्र पुण्यासाठी नवीन राहिलेले नाही. सोमवारी पुण्यात झालेला पाऊस अचानक आला, कमी वेळात जास्त कोसळला हे खरे असले तरी तो अतिप्रचंड वगैरे म्हणता येणार नाही. तरीही पुण्याच्या तथाकथित विकासाचे रस्त्यारस्त्यांवर जलार्पण झाले. पुणे महापालिकेत सत्ता राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखविले. मात्र स्मार्ट सिटी तर दूरच; पण पुण्याचे कसे वाटोळे झाले आहे ते सोमवारच्या पावसाने दाखविले. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये. त्यापाठोपाठ पुण्यात गेले काही दिवस पडणाऱ्या पावसाने पुणेकरांना धडकी भरतेय. असही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

धो पाऊस पडल्यानंतर पाण्या निचरा होण्याऐवजी रस्त्यांवर फूट-दोन फूट पाणी तासन्तास साचून राहते. सोमवारी रात्री तेच झाले. घराघरात, सोसायटय़ांमध्ये, रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाण्याचे लोंढे घुसले. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकानांमध्ये भरलेला माल भिजताना हतबलतेने वे लागले. अन्नधान्याचा चिखल झाला. घरातील भांडीकुंडी वाहून गेली. हे ‘स्मार्ट सिटी’ पुण्यात घडले. पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय, असा प्रश्न आज जगाला पडला आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील पुराच्या परिस्थितीचे खापर पावसावर फोडले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही’ असे ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे वक्तव्य केले. पाऊस जरी विचारून पडत नसला तरी नियोजन महानगरपालिका आणि सरकारी यंत्रणाच करते ना? देशात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपने पुण्याच्या विकासाचे भलेमोठे स्वप्न दाखविले, परंतु भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला त्याचा पर्दाफाश सोमवारी तेथील रस्त्यारस्त्यांवर झाला. शहराचे मूळ प्रश्न सोडविण्यापेक्षा केवळ दिखावू, शोभेची कामे करण्यातच रस दाखविला गेला. जलव्यवस्थापन, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, रस्ते अशा मूलभूत कामांचे नियोजन करण्याऐवजी सुशोभिकरणाचा डोलारा करण्यातच महापालिकेचे कारभारी मश्गूल राहिले. कचरा व्यवस्थापनावर कोटय़वधी रुपये खर्च होऊनही राष्ट्रीय स्वच्छ शहर स्पर्धेत पुण्याचे मानांकन घसरते तेव्हाच विकासाच्या गप्पा आणि थापा लक्षात येतात. शहराची वाट्टेल तशी बेभरवशी वाढ आणि नियोजनाचे मार्ग तुंबल्यामुळे शहराची बकालतेकडे वाटचाल होत आहे, असा आरोप पुणे महापालिका प्रशानावर सामान अग्रलेखातून करण्यात आला आहे.

केवळ पावसावर ठपका ठेवून भागणार नाही, तर नियोजन काय केले ते पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या ‘महाशक्ती’ला सांगावे लागेल. पुण्यासारख्या शहरात विकास नियमावलीतील 270 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार झालेलेच नाहीत. शहरातील दोनशे बावन्न नाले-ओढय़ांपैकी केवळ 60 नाले-ओढे प्रवाही आहेत. अनेक नाले अतिक्रमणाने बुजले आहेत. आता तर मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने निळ्या पुररेषेच्या आत भिंत घालून जमीन तयार करण्याचा घाट घातला जातोय. अर्धवट असलेल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचे धाडस पुण्यातील भाजपच्या कारभाऱ्यांनी केले. निवडणुकांची चाहूल असताना संपूर्ण पुणे भाजपच्या होर्डिंग्जने नटले होते. पुणे बदलतंय अशी शेखी हे फलक मिरवीत होते. सोमवारच्या पावसात हे सगळेच फलक, त्यावरील आश्वासने, स्वप्ने वाहून गेली. पुण्याचा विकास या पावसात फक्त भिजला नाही तर वाहून गेला. विकासाच्या नावावर आपापल्या घरांवर तोरण हेच धोरण राबविले गेले काय, असा सवालही सामना अग्रलेखातून उपस्थित केला आहे,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading