fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

‘तन्मय इन हार्मनी’ या नवीन संकल्पनेच्या पहिल्या प्रयोगाला कला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

पुणे  : हार्मोनियम हे वाद्य मध्यस्थानी ठेवून, त्याला तबला, आणि ड्रम, गिटार पियानो या वाद्यांची मिळालेली समर्पक साथ, भारतीय पारंपारिक वाद्ये आणि पाश्चत्य वाद्यांच्या वाद्यवृंदाने सादर केलेल्या ८ नवीन रचना आणि या सांगीतिक जुगलबंदीला रसिकांनी दिलेला टाळ्यांच्या भरभरून प्रतिसाद, अशा बहारदार वातावरणात ‘तन्मय इन हार्मनी’ या अनोख्या संगीत मैफिलीचा पहिला प्रयोग यशस्वीपणे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस  ‘विहार’ या चारुकेशी रागावर आधारित रचनेमध्ये तन्मय देवचके यांच्यासोबत अमृता ठाकूरदेसाई आणि अथर्व कुलकर्णी यांनी सिंथेसायजरवर छंदातून त्रितालाचा एक नवीन रूप सादर केले. यानंतर जॅझ या संगीतप्रकारावर आधारित ‘सृजन’ ही रचना सादर झाली. तन्मय पवार यांनी गिटार’वर संथ लयीमध्ये सुरावटी छेडत अतिशय सुंदररित्या रचनेचा पाया भरला. ‘याद पिया की आए’ सारखी पारंपारिक ठुमरी व जॅझ सुरावट बेमालूमपणे एकमेकांत मिसळून एक नवा अविष्कार रसिकांना ऐकायला मिळाला. यावेळी आशय कुलकर्णी यांनी तबला तर अभिषेक भुरुक यांनी पर्कशन्सवर अप्रतिम सवाल नवाब सादर केले.

यानंतर नव्यानेच कंपोज केलेल्या ‘अनुभूति’ या रचनेने मैफिलीत आणखी रंग भरले. ७ मात्रांच्या विविध लयीचा संदर्भ असलेल्या या रचनेला रसिकांनी टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये तन्मय यांनी सुरुवातीला ‘पढंत’ म्हणजे तबल्याचे बोल म्हणत रसिकांची मने जिंकली. राजस्थानमधील लोककलावंतांनी अजरामर केलेल्या ‘केसरिया बालम पधारो’ या रचनेचे ‘तन्मय इन हार्मनी’ व्हर्जन, केवळ  अकुस्टिक गिटार व हार्मोनिअम अशा ‘अनप्लग्ड’ स्वरुपात सादर झालेली राग तिलक कमोदवर आधारित ‘सुकून’ ही रचना, बहिणाबाईंच्या ओवी पासून, रोजा, सुरमई अखियोमे ते रागदारी रचनांचा समावेश असलेल्या राग ‘पिलू’ वर आधारित रचनांचा मेलडे, ‘बॉसानोव्हा’ या स्पॅनिश तालप्रकारावरील रचना आणि कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी सादर झालेल्या पारंपारिक भैरवीत खास मेटल रॉक व शास्त्रीय संगीत यांचा सुरेख संगम आणि सोबतीला तन्मय यांनी सांगितलेले अनेक मजेशीर किस्से ऐकत रसिकांनी या नाविन्यपूर्ण मैफिलीचा भरभरून आनंद लुटला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading