Sunday, August 30, 2026
Latest NewsPUNE

पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची – रवींद्र धारिया

पुणे : “पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयापासूनच रुजायला हवा. यामध्ये पालकांसह शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व पटवून द्यायला हवे,” असे मत ‘वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.

ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत ‘वनराई’च्या पर्यावरण वाहिनी व लायन्स क्लब इको फ्रेंड्सच्या पुढाकाराने शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेत धारिया मार्गदर्शन करत होते. प्रसंगी ‘वनराई’चे सचिव अमित वाडेकर, वाहिनीचे प्रकल्प संचालक भारत साबळे, लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सचे अनिल मंद्रुपकर, किशोर मोहोळकर, प्रतिभा खंडागळे, शमा गोयल, मेघा आंबवले आदी उपस्थित होते. या सप्ताहात ‘लायन्स’च्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी, पुना वेस्ट, फ्युचर, विधिज्ञ, मुकुंदनगर, शिवाजीनगर, सुप्रिम, पुणे रिव्हर साईड, मैत्री या क्लबने सहभाग घेतला. आभार तृप्ती व्हावळ यांनी मानले.

किशोर मोहोळकर यांनी पर्यावरण आणि आपण या विषयावर मार्गदर्शन केले. वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती, कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण, कचऱ्यातून अर्थार्जन अशा विविध मुद्यांवर त्यांनी विचार मांडले. अनिल मंद्रुपकर यांनी इको फ्रेंड्सच्या माध्यमातून सुरु असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी शिक्षकांना आयुष मंत्रालय व औषधी वनस्पती सुविधा केंद्राचे डॉ. दिगंबर मोकाट यांच्या सहयोगातून औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले.

मुख्याध्यापक, शिक्षक व विदयार्थी यांच्या सहकार्यातून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामीण विकासाचा कार्यविस्तार पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्यासाठी वनराईची पर्यावरण वाहिनी काम करत असून राज्यातील ४०० शाळांतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे शिक्षण देण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे बीजे रोवणे, त्यांना पर्यावरणाप्रती संवेदनशील आणि कृतीशील बनविण्यासाठी वनराई शिक्षकांसाठी  अशा कार्यशाळा घेत असल्याचे साबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading