सैनिक व त्यांच्या कुटुंबांप्रती जनतेने विश्वस्त भावनेने कार्य करावे – शरदचंद्र फाटक
पुणे : अत्याधुनिक शस्त्रास्त्रांबरोबर, देशवासियांची कृतज्ञता, सैन्यदलाचे मनोबल वाढवणारी ठरते. केवळ युद्धप्रसंगाच्या वेळी अनेकांना सैनिकांची आठवण होते. तसे न करता सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती, जनतेने कायमच विश्वस्त भावनेने कार्यरत रहायला हवे, असे मत भारतीय वायुसेनेचे निवृत्त अधिकारी शरदचंद्र फाटक यांनी व्यक्त केले.
सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे विजयादशमीनिमित्त देशासाठी प्राणांची बाजी लावणारे वयाच्या ८५ वर्षे ओलांडलेले भारतीय वायुसेनेचे निवृत्त अधिकारी शरदचंद्र फाटक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. जनता सहकारी बँकेचे संचालक अमित घैसास यांच्या हस्ते फाटक यांच्या सांगवी येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
यावेळी सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित, आयुर्विमाच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकारी योगिनी पाळंदे, त्वष्टा कासार समाज ग्रंथालयाचे गिरीश पोटफोडे, आयोजक आनंद सराफ, किरण पाटोळे, सुवर्णा बोडस, कल्याणी सराफ, अमर लांडे, शरद खळदकर, सुनील हिरवे, होनराज मावळे आदी उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी फाटक यांचे सपत्नीक औक्षण देखील केले. तिरंगी उपरणे, सन्मानचिन्ह, घरगुती मिठाई त्यांना भेट देण्यात आली.
अमित घैसास म्हणाले, सैन्यदलात असताना देशाचे रक्षण करुन देश पुढे नेण्याचे काम सैनिक करीत असतात. तर, सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सैन्याला उपयोगी असे साहित्य तयार करुन एक उद्योजक म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम देखील सैनिक करीत असतात. सैनिक देशासाठी सर्वस्व अर्पण करुन कार्यरत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी.
आनंद सराफ म्हणाले, सन १९९६ पासून सैनिकांसाठी कृतीशील काम करण्याचा प्रयत्न सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जात आहे. तिरंगी झेंडयासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांच्या प्रत्येक सणाला पहिला मान आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हे सण साजरे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भूमी आणि मातृभूमी यातील फरक जाणून घेण्याकरीता प्रत्येकाने सैनिकाचे जीवन समजून घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले. अमर लांडे यांनी साकारलेल्या रंगावलीने आणि खळदकर बंधू यांनी सनई-चौघडा वादनाने सर्वांचे स्वागत केले.