fbpx

लीजेंड्स लीग क्रिकेट : टेलर, जॉन्सनच्या फटकेबाजीमुळे इंडिया कॅपिटल्स विजेते

जयपूर  : भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एसकेवाय २४७.नेट SKY247.net लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत इंडिया कॅपिटल्स संघाने विजेतेपद पटकावले. येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात  गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया कॅपिटल्स संघाने भिलवाडा किंग्ज संघाचा १०४ धावांनी पराभव केला. 
 
इंडिया कॅपिटल्सने २० षटकांत ७ बाद २११ अशी भक्कम मजल मारली. या आव्हानाचा सामना करताना किंग्ज संघाचा डाव १८.२ षटकांत १०७ धावांत आटोपला. 
 
रॉस टेलर (४१ चेंडूत ८२) आणि मिशेल जॉन्सन (३५ चेंडूत ६२) यांनी पाचव्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. याच भागीदारीमुळे कॅपिटल्सचे आव्हान भक्कम झाले. पण, आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज संघाकडून मोठी भागीदारीच झाली नाही. 
 
किंग्जची सलामीची जोडी मॉर्न व्हॅन विक (5) आणि विल्यम पोर्टरफिल्ड (12) पहिल्या चार षटकांतच बाद झाले. युसूफ पठाण (6) वर बरेच काही अवलंबून होते, परंतु तो फार काळ टिकला नाही. शेन वॉटसन (२७) धावबाद होणे त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरले. जेसल कारियाने (२२) एकाबाजूने नेटाने लढत दिली. पण, त्याला समोरुन साथच मिळाली नाही. 
 
इंडिया कॅपिटल्सकडून पवन सुयाल (2-27), पंकज सिंग (2-14) आणि प्रवीण तांबे (2-19) यांनी अचूक मारा केला. कॅपिटल्स संघाकडून परिपूर्ण सांघिक खेळाचे प्रदर्शन बघायला मिळाले. त्यांच्या फलंदाजांना धावा उभारल्यावर त्यांना गोलंदाजांकडून सुरेख साथ मिळाली. त्यांचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. 
 
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर भिलवाडा किंग्जचा कर्णधार इरफानने दोन्ही बाजूने नवा चेंडू फिरकीच्या हातात दिला. त्याची ही खेळी चांगलीच यशस्वी ठरली. पाच षटकांतच त्यांनी कॅपिटल्सचे चार फलंदाज तंबूत परत पाठवले. मॉंन्टी पानेसर आणि राहुल शर्मा यांच्या प्रभावी फिरकीमुळे कॅपिटल्स एकवेळेस ४ बाद २१ असे अचडचणीत आले होते. पण, त्यानंतर टेलर आणि जॉन्सन यांनी किंग्जच्या गोलंदाजांचे घामटे काढले. सामन्यातील नवव्या षटकांत टेलरने चार षटकार, एका चौकारासह ३० धावा कुटल्या. हेच षटक निर्णायक ठरले. त्यानंतर किंग्जचे गोलंदाज टेलरला रोखूच शकले नाहीत. 
 
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज टीम ब्रेसननने अखेर १५व्या षटकांत जॉन्सनला बाद करुन ही भागीदारी मोडीत काढली. तोपर्यंत उशीर झाला होता. तोवर जॉन्सनने सात चौकार आणि तीन षटकार टोकून किंग्जच्या गोलंदाजांना निष्रभ केले होते. 
 
टेलर 17 व्या षटकां बाद झाला. त्याने आपल्या झंझावाती खेळीत आठ षटकार आणि चार चौकार लगावले. त्यानंतर अॅशले नर्सने (19 चेंडूत 42 धावा) डेथ ओव्हर्समध्ये आक्रमक  खेळून कॅपिटल्सचे आव्हान भक्कम राहिल याची काळजी घेतली.

Leave a Reply

%d bloggers like this: