Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

शिक्षक महाभोंडला स्पर्धेत धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान प्रथम 

पुणे :  श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात शिक्षक महाभोंडला स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानने प्रथम क्रमांक पटकाविला. पुण्यातील १४ शाळांतील शिक्षकांच्या संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमाला पं. नंदकिशोर कपोते, पूजा थिगळे, खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, परीक्षक शिरीषा जोशी, निवेदिता मेहेंदळे, मंदिराचे विश्वस्त तृप्ती अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल आदी उपस्थित होते.

मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर शाळेच्या शिक्षक संघाचा द्वितीय तर, चंद्रकांत दरोडे विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला. स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी पहिल्या तिन्ही क्रमांकाच्या विजेत्यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली.

स्त्री भ्रूण हत्या, देवीची नऊ रुपे, स्त्री शक्तीचे महत्व आणि महात्म्या भोंडल्याच्या वेळी झालेल्या खेळांतून शिक्षकांनी उलगडले. भोंडल्याच्या पारंपरिक गाणी व खेळ मंदिराच्या सभामंडपात सादर करण्यात आले. शिक्षक पारंपरिक वेशात स्पर्धेत सहभागी झाले होते.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये भोंडला हा एक प्रकार अनेक वर्षांपासून नवरात्रीमध्ये केला जातो. मात्र, आज भोंडल्याविषयी माहिती लहान मुली व तरुणांनी फारशी नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी भोंडल्याविषयी अधिकाधिक माहिती गोळा करावी आणि विद्यार्थ्यांनाही याची माहिती सांगावी, याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading