आजाराच्या काळात सकारात्मकता आणि इच्छाशक्ती ही औषधांसाठी अधिक प्रभावी ठरते – डॉ. शां.ब मुजुमदार
पुणे : गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, १२ -१३ वेळा अँजीओग्राफी, कर्करोग आणि आरोग्याच्या इतर तक्रारी अशा अनेक जीवघेण्या आजारांचा सामना डॉ. अरुण किनरे यांनी केला आणि त्यातून ते बाहेर देखील पडले. त्यांचे आयुष्य आणि त्यांचे हे पुस्तक आपल्याला एकच संदेश देते, ते म्हणजे कितीही दुर्धर आजार झाला, तरी हार मानू नका. आजारांच्या काळात सकारात्मकता आणि इच्छाशक्ती ही औषधांसाठी अधिक प्रभावी ठरते, असे मत सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. शां.ब मुजुमदार यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. अरुण किनरे यांच्या स्वानुभवावर लिखित ‘डायरी ऑफ ए डॉक्टर पेशंट’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मजुमदार यांच्या हस्ते व बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पंडित, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, डॉ. किनरे यांच्या पत्नी स्मिता किनरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, दि. २ ऑक्टोबर रोजी सेनापती बापट रस्ता येथील सिम्बायोसिस विश्वभवन येथे संपन्न झाले.
डॉ. मुजुमदार म्हणाले,” एखादा सामान्य माणूस नुसते आपल्याला एखादा आजार झालाय हे ऐकूनच खचून जातो, मात्र डॉ. किनरे यांनी एवढे आजार होऊनदेखील अतिशय आनंदाने आणि समाधानकारकपणे आपले आयुष्य जगले. त्यांनी जगण्यावर भरभरून प्रेम केले. ते न केवळ निराळे व्यक्तिमत्त्व आहे, परंतु एका अर्थाने मृत्युंजय आहे. त्यांचे हे पुस्तक नक्कीच अनेक वाचकांना प्रेरणादायी ठरेल.”
डॉ. आनंद पंडित म्हणाले,” डॉ. अरुण यांनी विविध वैद्यकीय समस्यांचा सामना केला. तो अतिशय खडतर काळ होता. त्याच्या या प्रवासाचे आम्ही, त्याचे मित्र हे साक्षीदार आहोत, तो लवकरात लवकर या सर्वांतून बाहेर पडावा, अशी आम्ही नेहमीच प्रार्थना करत होतो. ज्या पद्धतीने त्याने या परिस्थतीशी झुंज दिली ती खरोखरच कौतुकास्पद आहेत. या पुस्तकाने मला आपली वागणूक कशा प्रकारे असावी हे शिकविले. एक समाधानकारक आयुष्य काय असते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात पाहायला मिळते.
सतीश आळेकर म्हणाले,” डॉ. अरुण यांचे हे पुस्तक साहित्यिक चिरफाड करण्यापलीकडील आहे. एका रुग्णाने आपल्या अनुभवावर लिहलेले हे पुस्तक लिहले आहे, आणि योगायोगाने तो रुग्ण स्वतः एक डॉकटर आहे. हे याचे वैशिष्ट्य ठरते. एका अजातशत्रू’च्या भावनेने त्यांनी स्वतः कडे पाहिले आहे. तटस्थ पद्धतीने लिहलेल्या या पुस्तकात काही प्रसंगातील अतिशय मजेशीर स्वरूपात तर काही अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या पद्धतीतील आहे. डॉ अरुण यांचे पुस्तकातील लेखन हे ताकदीचे लेखन आहे.”
डॉ. किनरे म्हणाले, ” ४ जानेवारी १९९७ – पहिला हार्ट अटॅक आला. आणि त्यानंतर पुढील २५ वर्षे विविध आजारांची मालिका सुरू होती, अजूनही आहे. माझ्या आजारपणाच्या काळात मला अनेक अनुभव आलेत. त्यातील काही प्रसंग खूप मजेशीर होते. या काळात माझे सहकारी, माझे कुटुंबीय, डॉकटर आणि अनेक ओळखीच्या माणसांनी केलेले सहकार्य माझ्यासाठी मोलाचे आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मी त्यांचे आभार मानतो.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रेडिओलॉजिस्ट डॉ. नेहा अग्रवाल यांनी केले.
