fbpx

देवीसमोर नतमस्तक होताच मिळते शक्ती आणि उर्जा – डॉ.संगीता बर्वे

पुणे : मी न राहिले दुबळी आता… पोलादापरी केले मन… अशी आजच्या काळातील महिलांची कहाणी कवितेद्वारे मांडत ज्येष्ठ लेखिका डॉ. संगीता बर्वे यांनी स्त्री शक्तीचा महिमा उपस्थितांना सांगितला. देवीसमोर सगळ्या महिला नतमस्तक होतात. त्यावेळी देवीकडून शक्ती आणि उर्जा मिळते. या मंदिरामध्ये देखील विशेष ऊर्जा असते. त्यामुळे येथे झालेल्या या सन्मानाने आम्हाला जबाबदारीची जाणीव निर्माण झाली, असे मतही डॉ.बर्वे यांनी यावेळी व्यक्त केले.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ लेखिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, विशाल सोनी, नगरसेविका रुपाली धावडे आदी उपस्थित होते.

साहित्यिक महिलांमध्ये डॉ. संगीता बर्वे, गीतांजली जोशी, डॉ. अपर्णा महाजन, डॉ. शुचिता नांदापूरकर फडके यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. संगीता बर्वे यांच्या पियुची वही या रोजनिशीवजा पुस्तकाला यंदाचा उत्कृष्ट बालसाहित्य निर्मितीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

गीतांजली जोशी यांनी हा सत्कार माझ्या माहेरचा आहे असे सांगून आनंद व्यक्त केला. डॉ. अपर्णा महाजन या निवृत्त प्राध्यापिका असून इंग्रजी-मराठी साहित्य, नाट्यशास्त्र, बालसाहित्य, स्त्रीवाद, भाषांतर हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी पुरस्काराने भारावून गेल्याचे सांगितले.

डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांचे ६६ अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांनी पुरस्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळणार असे सांगितले. विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे सीईओ विशाल सोनी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसंपादक संदीप तापकीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विश्वस्त प्रवीण चोरबेले यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: