पोर्ट्रेट रंगावलीतून ‘भारतकन्यांचे’ सुरेख चित्रण
पुणे : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, यशस्वी महिला सुधा मूर्ती, सरस्वतीकन्या आशा भोसले यांच्यापासून ते फ्लाईंग वुमन गुंजन सक्सेना, गोल्डन गर्ल हिमा दास, अभिनेत्री विद्या बालन, मिसाईल वुमन टेसी थॉमस, पत्रकार ज्ञानदा कदम आणि पुण्यातील ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनिषा साठे यांच्यापर्यंत भारतातील नामवंत महिलांचे रंगावलीतून सुरेख चित्रण करण्यात आले आहे. पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शनातून या भारतकन्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला आहे.
श्रीरंग कलादर्पणच्या विद्यार्थीनींनी एरंडवण्यातील सहकार उद्यान येथे नवदुर्गा : नवरात्री विशेष पोर्ट्रेट रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय रांगोळीकार अक्षय शहापूरकर, श्रीरंग कलादर्पण च्या विद्यार्थिनी व आयोजक शारदा अवसरे, मेघा म्हेत्रे, अंजली गायधने, प्राजक्ता शिंदे, कीर्ती गौरीधर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय नेतृत्व द्रौपदी मुर्मू, एक हात आधाराचा सुधा मूर्ती, सरस्वतीकन्या आशाताई भोसले, मिसाईल वूमन टेसी थॉमस, नृत्यसम्राज्ञी मनिषाताई साठे, फ्लाईंग वूमन गुंजन सक्सेना, गोल्डन गर्ल हिमा दास, एंटरटेनमेंट…एंटरटेनमेंट… विद्या बालन, काय सांगशील ज्ञानदा अशी आकर्षक बोधवाक्ये देऊन त्या महिलांच्या कार्यकर्तृत्वाचे वर्णन करीत रंगावली साकारण्यात आल्या आहेत. दिनांक ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन सहकार उद्यान एरंडवणे, पुणे येथे सर्वांना विनामूल्य खुले असणार आहे.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ज्या ज्या क्षेत्रात महिलांनी कर्तृत्व गाजविले आहे. त्या क्षेत्रातील महिला या रंगावलीच्या कलेतून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील बारकावे इतके सुंदर आहेत की त्याचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे. कला ही फक्त डोळ्यांनी पाहिली तरी मन सुखावते. कलेतून माणसाला ऊर्जा तर मिळतेच परंतु ती कला बघून थकवा पण निघून जातो.
मनिषा साठे म्हणाल्या, प्रदर्शनात रेखाटलेल्या रांगोळीतून फक्त चेहरा नाही, तर त्या व्यक्तीचे कर्तृत्व त्यांच्या चेह-यावरील भावात दिसत आहे. ही रांगोळी काही वेळानंतर नष्ट होणार आहे, हे माहिती असून देखील जीव ओतून ही कला साकारली आहे, हे महत्वाचे आहे. छायाचित्र काढणे तसे सोपे आहे, पण चित्र आणि रांगोळीतून ते भाव दाखविणे अत्यंत अवघड आहे.
अक्षय शहापूरकर म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक स्त्रीला मातेचा दर्जा दिला आहे. स्त्रीमध्ये प्रत्येक गोष्ट नव्याने निर्माण करण्याची ताकद आहे. मातृत्वाची ती ताकद समजून घेतली पाहिजे. त्या स्त्री शक्तीला रांगोळी प्रदर्शनातून वंदन करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.