Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

आंबेगाव स्कूलबस दुर्घटना : .. अन् वेदना विसरून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं

बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची पालकमंत्र्यांकडून विचारपूस

पुणे : साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा हात मायेने फिरला…घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत चॉकलेट दिले….आणि काही क्षण आपल्या वेदना विसरून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं…शाळेने दिलेले संस्कार न विसरता तिने याही स्थितीत ‘थँक यू’ म्हटलं… जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि त्यांचे दोन शब्द सुखावून गेले…..

आंबेगाव तालुक्यात गिरवली येथील बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची पाटील यांनी आज सकाळी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक सर्व आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी डॉक्टरांना‌ केल्या.

आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पाच विद्यार्थी आणि चालकावर भोसरी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम उपचार द्यावेत असे त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना भेटणार असल्याने त्यांनी सोबत ‘खावू’देखील नेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधतांना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या. पालकमंत्र्यांनी मुलींच्या पालकांशीही चर्चा करून मुले लवकर बरे होतील, त्यांच्यावर चांगले उपचार होतील, चिंता करू नका अशा शब्दात त्यांना धीर दिला. त्यांची ही भेट जखमी विद्यार्थींनींसाठी सुखद आणि धीर देणारी ठरली.

यावेळी साईनाथ रुग्णालयाचे संचालक डॉ.सुहास कांबळे, गणेश भेगडे, अमोल थोरात नामदेव ढाके, सदाशिव खाडे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading