fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

कलाकारांच्या मांदियाळीत रंगली झी मराठी अवॉर्ड्स २०२२ची नॉमिनेशन पार्टी

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. या मुख्य सोहळ्याइतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो नामांकनाचा सोहळा. एका विशिष्ट थीमवर आधारित असलेल्या या सोहळ्याची यावर्षी ‘Look Glamorous To Kill’ अशी थिम होती.

झी मराठी अवॉर्ड्स २०२२ ची नॉमिनेशन पार्टी मुंबईत पार पडली. या पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी थीमनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ‘संदीप पाठक आणि  प्रणव रावराणे’ यांनी केले. सुमीत राघवन आणि अमेय वाघ यांच्यातील फेसबुक वॉर नुकतंच सगळ्यांनी अनुभवलं. त्या वॉरचं उत्तर आज माध्यमांना मिळालं. कारण यावर्षीच्या झी मराठी अवॉर्डच सूत्रसंचालन सुमीत आणि अमेय करणार आहेत, आणि या दोघांच्या टीममध्ये टशन असणार आहे. हे टशन नक्की काय आहे हे यासाठी प्रेक्षकांना झी मराठी अवॉर्डची वाट पाहावी लागणार आहे.

यंदा ‘अप्पी आमची कलेक्टर, तू चाल पुढं, सातव्या मुलीची सातवी मुलगी, नवा गडी नवं राज्य, तू तेव्हा तशी, माझी तुझी रेशीमगाठ आणि दार उघड बये’ या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बहीण-भाऊ, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकन जाहीर करण्यात आली. या नामांकन सोहळ्यात अनिता दाते केळकर, कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, रोशन विचारे, सानिया चौधरी, तितिक्षा तावडे, रोहित परशुराम, शिवानी नाईक, अजिंक्य ननावरे, ऐश्वर्या नारकर यांच्यासह झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील सर्व कलाकारांची उपस्थिती होती. पार्टीत सर्वच सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे लवकर कळेल. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्यांना वोट करून जिंकवू शकतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading