fbpx

सत्यशोधक साहित्याच्या प्रदर्शनाला पाचशेहून अधिक नागरिकांची भेट

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित सत्यशोधक साहित्याच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. याच दिवशी असणाऱ्या ‘हेरिटेज वॉक’ लाही नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी पाचशेहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

महात्मा फुले यांनी पुण्यात २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाजाला १४९ वर्षं पूर्ण होऊन तो दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक घटनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून इतिहास विभागातर्फे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संग्रहालयात सत्यशोधक साहित्याचे प्रदर्शन आयोजित केले होते.

लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळवलेल्या सत्यशोधक साहित्यासह विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, फर्ग्युसन कॉलेजचे वाडिया ग्रंथालय, शाहू वाचनालय काकडवाडी, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मृती ग्रंथालय, कुकाणे, तसेच खर्डेकर ग्रंथालय, शिवाजी विद्यापीठ अशा विविध ग्रंथालयांमधून आणलेल्या सत्यशोधक साहित्याच्या प्रती जनतेला पाहण्यासाठी यावेळी उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ.श्रद्धा कुंभोजकर, प्रा.बाबासाहेब दुधभाते, प्रा. देवकुमार अहिरे, प्रा.राहुल मगर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाला भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे उपसंचालक विनोद कुमार, बार्टी चे माजी संचालक डी.आर. परिहार, पोलीस गुप्तचर विभागातील माजी संचालक अशोक धिवरे, इतिहास संशोधक चंद्रकांत अभंग, प्रा.राजेश्वरी देशपांडे आदी मान्यवरांनीही भेट दिली.

दरम्यान यावेळी चौथ्या शनिवारी आयोजित ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाला देखील विद्यार्थी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

Leave a Reply

%d bloggers like this: