fbpx

सुशीलकुमार शिंदे यांना ‘महर्षी’ पुरस्कार जाहीर

पुणे : पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मनाचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या हस्ते  ३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम व प्रवीण मसाले उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सन्मानचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, चांदीची मुद्रा, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

आबा बागुल म्हणाले की, ‘समाजात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी ‘महर्षी’ पुरस्कार देऊन गौरवले जाते. समाजात या ऋषितुल्य व्यक्तींचा सन्मान व्हावा व तरुण पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा यामागे आहे. अशा व्यक्तींचा गौरव म्हणजे जीवनातील उदात्त प्रेरणांचाच गौरव आहे’ असे सांगून आबा बागुल म्हणाले की ‘राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते आदरणीय सुशीलकुमार शिंदे यांना दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार म्हणजे गुरूने शिष्याचा केलेला हा सत्कार मानावा लागेल.’

Leave a Reply

%d bloggers like this: