एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा कारभार त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे चालवतात का? – रविकांत वर्पे
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. पण ते दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे मुख्यंमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून मुख्यमंत्री पदाचा कारभार चालवतात, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे करण्यात आला आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
वर्पे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजारीत चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. असा कसा धर्मवीर? असा सवालही रविकांत वर्पे यांनी विचारला.
याचवेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही हल्लाबोल केला. भाजपचे केंद्रीय मंत्री धमक्या आणि शिवराळ भाषा वापरतात हे कितपत योग्य आहे. महाराष्ट्रात उद्योग गुंतवणुक यावी यासाठी प्रयत्न करा केंद्रात मंत्री असल्याचा महाराष्ट्राला काही फायदा आहे का? असा खोचक टोलाही त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर,’1 डॉलर = 81.20 रु रुपया. गेल्या 75 वर्षातील नीचांकी पातळीवर आहे. भाजप म्हणजे आर्थिक गैरव्यवस्थापन. याकडेही त्यांनी राज्य सरकार आणि केंद्राचे लक्ष वेधले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपती मंडळ, नवरात्र उत्सव, पितृपक्ष किंवा दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेंच काम पाहण्याची जबाबदारी त्यांनी सुपर सीएम म्हणून श्रीकांत शिंदेंकडे दिल्याचे दिसत आहे. पण राज्याचा कारभार नेमकं कोण पाहतंय? असा सवाल वर्पे यांनी उपस्थित केला आहे. हे राज्य अधांतरी आहे असंच वाटतंय. ज्याला जे वाटतंय,तसं तो करतोय”, अशी टीकाही वर्पे यांनी केली.