पुण्याच्या आराध्याचा अवघ्या ७ व्या वर्षी विश्वविक्रम
उत्तम स्मरणशक्तीच्या बळावर न पाहता बायनरी कोड ओळखण्याचा विक्रम
पुणे – पुण्याच्या आराध्या जगताप हिने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या मेमरी स्पर्धेमध्ये विक्रम नोंदवला आहे. अवघ्या ७ व्या वर्षी बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या बळावर तिने हे यश मिळविले असून विश्वविक्रम केला आहे. भारतातून एकूण २५ मुलांमध्ये आराध्याला सन्मानित करण्यात आले.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड स्वित्झर्लंडच्या अध्यक्षा पूनम जेझलर, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड स्वित्झर्लंडचे मुख्य विल्हेम जेझलर, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.
वर्ल्ड रेकॉर्डसाठी आराध्या जगताप हिला ५२ पत्ते पिसून दिल्यानंतर ते न बघता तिने ओळखून दाखविले. या रेकॉर्डचा तिने १ मिनिटे ९ सेकंदामध्ये विक्रम नोंदविला आहे. इंडिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये १ मिनीटात १८० बायनरी कोड ओळखले तर २ मिनिटे २७ सेकंद मध्ये ३०० बायनरी कोड ओळखून दोन विक्रम नोंदविले आहेत. महिन्याभरातच तिने हे दोनही विक्रम केले आहेत.
आराध्या पुण्यातील क्लाइन मेमोरियल स्कूल ऑफ यूबीएस या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकते. आराध्याला चित्रकला, नृत्य, मेडिटेशन, बॅडमिंटन, सायकल चालवण्याची आवड आहे. तिला मॅपाॅलाॅजीची आवड असून रुबिक क्यूब सोडवायला देखील आवडते तर तिने नुकताच क्यूब इंडिया फेडरेशनच्या स्पर्धेत देखील सहभाग घेतला. तिचे वडील इंजिनियर आहेत. तिची आई क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते, तर गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिकविते.
आराध्याचे वडील राहुल जगताप म्हणाले, तिची स्मरणशक्ती लहानपणापासून चांगली आहे. तिला कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती तिला लक्षात राहत असे. आराध्याची आई राधिका जगताप म्हणाल्या, मी नेहमी आराध्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांना प्राधान्य दिले आहे. सर्व मुले हुशार असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते.
