Friday, September 11, 2026
Latest NewsMAHARASHTRA

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती सदस्य सचिवांच्या मानधनात वाढ – चंद्रकांत पाटील

मुंबई :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे लेखन आणि भाषणे संकलित आणि संपादित करून प्रकाशित करण्याचे अतिशय महत्वाचे आणि ऐतिहासिक असे कार्य सुरू आहे. या समितीत कार्यरत असलेल्या सदस्य सचिव व सदस्यांना काम करताना त्यांच्या पदाला अनुसरून मानधन व सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली.

आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.पाटील यांनी घोषणा केली.

पाटील म्हणाले, या समितीला सोयी सुविधा दिल्यास दर्जेदार काम वेळेत पूर्ण होईल. यापूर्वी समितीच्या सदस्य सचिवांना 10 हजार रुपये मानधन दिले जात होते. त्यात वाढ करण्यात येत असून आता 25 हजार मानधन देण्यात येईल. समितीचे संशोधन व प्रकाशनाचे काम जलद गतीने होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला. तसेच समितीला कार्यालय उपलब्ध करण्यासोबतच सदस्यांना अभ्यास व इतर कामकाज करण्यासाठी शासकीय महाविद्यालय व विद्यापीठात जागेची व्यवस्था याबाबत चर्चा करण्यात आली. समितीकडे उपलब्ध हस्तलिखित जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असेही श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीला आमदार लहू कानडे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,पुणे सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव,सहसंचालक डॉ.सोनाली रोडे,समितीचे सदस्य,प्रा. सिद्धार्थ खरात,ज.वि. पवार,डॉ.भालचंद्र मुणगेकर, डॉ.योगीराज बागुल, डॉ.संभाजी बिरांजे ,डॉ. धनराज कोहचाडे, डॉ.कमलाकर पायस,समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading