सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षारंभानिमित्त २४ सप्टेंबर रोजी प्रदर्शन
पुणे: महात्मा फुले यांनी पुण्यात २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. २४ सप्टेंबर २०२२ रोजी सत्यशोधक समाजाला १४९ वर्षं पूर्ण होऊन तो दीडशेव्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक घटनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून इतिहास विभागातर्फे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संग्रहालयात सत्यशोधक साहित्याचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीतून मिळवलेल्या सत्यशोधक साहित्यासह विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय, फर्ग्युसन कॉलेजचे वाडिया ग्रंथालय, शाहू वाचनालय काकडवाडी, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मृती ग्रंथालय, कुकाणे, तसेच खर्डेकर ग्रंथालय, शिवाजी विद्यापीठ अशा विविध ग्रंथालयांमधून आणलेल्या सत्यशोधक साहित्याच्या प्रती जनतेला पाहण्यासाठी यावेळी उपलब्ध असतील. सत्यशोधक विचारांची पुस्तके, वृत्तपत्रे आणि कार्यकर्त्यांची माहिती या प्रदर्शनात मांडली जाईल असे इतिहास विभागाच्या प्रमुख. प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी सांगितले. डॉ. कुंभोजकर यांच्या संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून जमा केलेल्या या साहित्याच्या अभ्यासासाठी त्यांना भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचं अनुदान मिळालं आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ब्रिटिशकालीन मुख्य इमारतीत पहिल्या मजल्यावरील इतिहासविषयक संग्रहालयामध्ये येथे दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मा. कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत केलं जाईल.
दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात हे प्रदर्शन सुरू राहील. तसंच नेहमीप्रमाणे २४ सप्टेंबर या चौथ्या शनिवारी विद्यापीठ मुख्य इमारतीची वारसा सहल सकाळी ११ वाजता आयोजित केली जाईल. तरी नागरिकांनी सत्यशोधक साहित्याचे प्रदर्शन पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा.
