Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सुमधुर संवादिनी वादनाने रंगली संगीतमय मैफल

पुणे : संवादिनी मधून निर्माण होणारे नादमय स्वर, त्याला तबल्याची तालमय साथ आणि वाद्यांची जुगलबंदी करत संवादिनी वादक आणि कलाकारांनी अप्रतिम वादनातून गुरूंचे सांगितीक स्मरण केले.  अप्रतिम संवादिनी वादन आणि त्याला तितकीच सुमधुर तबल्याची साथ यामुळे रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे ज्येष्ठ संवादिनी वादक पं. मनोहर चिमोटे यांच्या १० व्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे ज्येष्ठ शिष्य पं. शारंगधर साठे आणि पं. तुळशीदास बोरकर यांचे ज्येष्ठ शिष्य सुधीर नायक यांनी वादनातून आपल्या गुरूंना सांगीतिक मानवंदना दिली. संगीत मैफिली पूर्वी पराग घोंगे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी विक्रम गोखले यांच्या हस्ते झाले .डॉ. नटचंद्र चिमोटे, संगीततज्ञ डॉ. विकास कशाळकर. पं. हेमंत पेंडसे, पं. प्रमोद मराठे, अंजली मालकर, पं. अरविंदकुमार आझाद, पं. रघुनाथ खंडाळकर, पं. भरत कामत यावेळी उपस्थित होते.
सुधीर नायक यांनी पं. तुळशीदास बोरकर यांची राग किरवाणीमधील रूपक मध्ये बांधलेली बंदिश सादर करून आपल्या मैफिलीची सुरुवात केली. अप्रतिम संवादिनी वादन आणि त्याला तितकीच सुमधुर तबल्याची साथ यामुळे रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. विघ्नेश कामत यांनी तबल्याची साथ संगत केली
त्यानंतर पं. शारंगधर साठे यांनी विलंबित जपतालातील बंदिश सादर करून  गुरु पंडित मनोहर चिमोटे यांना सांगीतिक आदरांजली वाहिली. हार्मोनियम वर फिरणारी बोटे त्यामधून निर्माण होणारे अप्रतिम सूर आणि त्याला अतिशय समर्पक अशी तबल्याची साथसंगत यामुळे मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.

साठे यांनी राग झिंझोटी मध्ये विलंबित झपताल आणि द्रुत तीनताल मध्ये गत सादर केली आणि भैरवी राग सादर करून पं.शारंगधर साठे यांनी आपल्या मैफिलीची अतिशय बहारदार सांगता केली. ऋषिकेश जगताप यांनी त्यांना तबल्याची साथ संगत केली.

विक्रम गोखले म्हणाले, व्यस्त वेळेमुळे किंवा कंटाळा केल्यामुळे मी संगीताचे शिक्षण घेऊ शकलो नाही, तरीही मी मोठ्या गायकांचे गायन कायम ऐकत आहे. त्यामुळे मी संगीत आत्मसात करू शकलो याचा मला अभिमान आहे.

डॉ. नटचंद्र चिमोटे यांच्या हस्ते  अभिनेते विक्रम गोखले यांना पंडितजींच्या विलक्षण संशोधनावर आधारीत ‘गंधार स्वरसंगती व संवाद पद्धतीने’ बांधलेल्या संवादिनीचे वाद्यार्पण करण्यात आले. विक्रम गोखले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना‘हे वाद्याचं दान आज मिळालं.. मी कृतार्थ झालो आज सर्वात श्रीमंत झालो’ अशी भावना व्यक्त केली.

पराग घोंगे  म्हणाले, संगीत ही सर्वश्रेष्ठ कला आहे. संगीताचे शास्त्रीय शिक्षण घेणे सर्वांनाच जमते असे नाही परंतु त्याचा निखळ आनंद मात्र प्रत्येक जण घेऊ शकतो, हाच प्रवास मी माझ्या पुस्तकातून मांडला आहे.

डॉ. विकास कशाळकर म्हणाले, नागपूरने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मोठे संवादिनी वादक दिले आहे त्यांची संवादिनी वादनाची पद्धत ही अतिशय वेगळी आहे. या पद्धतीचा सखोल अभ्यास करून ती जगासमोर आणली पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading