मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट वर गुन्हा दाखल
पुणे: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तोतयागिरी करणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय नंदकुमार माने असे तोतयागिरी करणाऱ्याचे नाव असून त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारचे कृत्य करणार्या इतरांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून तो सोशल मीडियामध्ये व्हायरल केला आहे. तसेच समाजमाध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपण आहोत अशी तोतयागिरी करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअॅप व फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेत असताना पोलिसांना एक फोटो मिळाला.
आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोशाख करुन
समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा अशा पद्धतीने वावरत होता.
आरोपीने जाणीव पूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी तोतयागिरी करुन ठकवण्याचा प्रयत्न केला.विजय माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
