नंदुरबार येथील घटनेवर व तातडीने कठोर कार्यवाही करवि – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अमित शाह आणि राहुल गांधी यांना निवेदन
पुणे :महाराष्ट्रात गेले तीन चार महिने स्त्रियांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, यावर तातडीने गंभीर उपाय करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह आणि काँग्रेस खासदार श्री. राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात केले.
अत्याचारांच्या विविध घटनांकडे लक्ष वेधताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथली घटना अतिशय भीषण आहे. येथील आदिवासी महिलेचे अपहरण आणि हत्या तसेच तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. काही तरुणांनी तिचे अपहरण केल्यावर तिने घरच्यांना केलेल्या मोबाईल कॉलच्या रेकॉर्डिंगमधून अनेक गोष्टी समोर आल्या. या कॉलनंतर १ ऑगस्ट २०२२ रोजी तिचे धड झाडाला टांगलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळाले. यावर पोलिसांशी पाठपुरावा करूनही व्यवस्थित प्रतिसाद न मिळाल्याने त्या महिलेच्या पित्याने तिचे शव मिठाच्या खड्ड्यात ठेवले. जेंव्हा दीड महिन्यांनी वृत्तपत्रातील बातमीच्या ही घटना समोर आली तेंव्हा डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती केली. यानंतर त्या महिलेचे शव जे जे रुग्णालयात आणले गेले आणि त्याचे शवविच्छेदन पार पडले.
नाशिक परिमंडळाचे पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणामध्ये तातडीने कार्यवाही केली. दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली.
याचप्रमाणे, देशभर गाजलेल्या उत्तरप्रदेशातील लखीमपूर गावातही अश्याच प्रकारची घटना घडल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी निदर्शनास आणले आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही सामुहिक बलात्काराच्या अनेक घटना गेल्या काही कळत घडल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
या पत्रांद्वारे डॉ. गोऱ्हे यांनी अमित शाह आणि राहुल गांधी यांचे लक्ष वेधले आहे की, विविध राज्यांमध्ये झालेल्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांतील गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचा दर अत्यंत कमी आहे. २०२१ च्या NCRB च्या सर्वेक्षणानुसार दोषसिद्धीचे प्रमाण महाराष्ट्रात ५४.४%, आंध्रप्रदेशात ८४.७%, तामिळनाडूमध्ये ७३.३%, उत्तरप्रदेशात ६३.४% तर गुजरातमध्ये २१.१% इतकं आहे. या पार्श्वभूमीवर विशेषतः महिलाविषयक गुन्ह्यांबाबत दोषसिद्धीचा दर वाढवण्यासाठी देशपातळीवर कामाची अत्यावश्यक आहे , या व अत्याचाराच्या संदर्भात होणाऱ्या अशा कार्यवाहीकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या
