Saturday, September 12, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी देशकार्यात योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना लोकशाहीला पुढे नेणाऱ्या युवकांशी संवाद साधताना आनंद होत असल्याचे सांगून समारोप भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताने जगाला विचारांनी जिंकले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेला पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करावे लागेल. सहिष्णुतेच्या आधारे एकमेकांना पुढे नेत विचारांची कटुता, भेदभाव बाजूला सारत भ्रष्टाचार समुळ नष्ट करूनच देशाला पुढे नेता येईल. देशाला युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहे. निडरता आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन युवकांनी देशकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन ही फडणवीस यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप सत्राला दूरदृष्य प्रणालीद्वारे त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार, पद्मभूषण सुमित्रा महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, राहुल कराड आदी उपस्थित होते.

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

युवकांनी आधुनिक विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवावे. छात्र संसदेतील विचारमंथनाच्या माध्यमातून विश्वबंधुत्वाच्या भारतीय विचाराचा प्रसार आणि‍ विकास करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोश्यारी म्हणाले, समाजाला सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र असल्याने आपल्याला स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी जीवनापासूनच चांगले लोकशाही राष्ट्र घडविण्याचा विचार करावा. जीवनात कोणत्याही परिस्थितीत निराश न होता उच्च ध्येय ठेवून वाटचाल सुरू ठेवावी.

छात्र संसदेच्या माध्यमातून देशातील विविधतेचे दर्शन-गिरीष महाजन
मंत्री महाजन म्हणाले, छात्र संसदेच्या माध्यमातून भारतातील विविधतेचे दर्शन घडते आहे. सरासरी ३० वर्ष वयाची  सर्वाधिक  लोकसंख्या भारतात आहेत. या युवाशक्तीला योग्य दिशा देण्यासाठी हे आयोजन उपयुक्त आहे. इथे ऐकलेले विचार व्यवहारात आणून युवकांनी देशकार्यासाठी योगदान द्यावे. लोकशाही व्यवस्था विकसीत करण्यासाठी युवकांनी राजकारणात यावे. त्याग, निष्ठा आणि समर्पण भावनेने काम केल्यास तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून युवकांनी देशविकासात अधिकाधीक योगदान द्यावे आणि  देशाला महाशक्ती बनविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवे स्वप्न घेऊन समाज घडवा-मीरा कुमार
श्रीमती मीरा कुमार म्हणाल्या, सामान्य, अतिसामान्य नागरिकांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यात सहभाग घेतल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. भौतिक प्रगती साधतांना मानसिक विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. परिश्रम आणि विवेक एकमेकांशिवाय अर्थहीन आहेत आणि त्यासोबत स्वप्नही आवश्यक आहे. नव्या पिढीने नवे स्वप्न घेऊन समाज घडविण्यासाठी, वंचितांना त्यांचे हक्क देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

चारित्र्य निर्माण महत्वाचे-सुमित्रा महाजन
श्रीमती महाजन म्हणाल्या, चांगले कार्य आवश्यक आहे, पण त्यापेक्षाही चारित्र्य निर्माण महत्वाचे आहे. मन शुद्ध ठेवून कर्तव्य भावनेने पुढे गेल्यास जीवनात निश्चितपणे यशस्वी व्हाल. राष्ट्रभावनेने कार्य केल्यास यश तुच्याकडे धावून येईल. आपल्या गुणांच्या आधारे समाजासमोर आपली प्रतिमा उभी रहाते आणि ती कायम रहाते हे लक्षात ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृतीचा लौकीक जगात पोहोचवा-डॉ.विश्वनाथ कराड
डॉ.कराड म्हणाले, आपल्या पालकांना अभिमान वाटेल असे कार्य युवकांनी करावे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञान प्रगतीचा खरा मार्ग आहे. सुख, समाधान आणि शांतीचे नवे स्वरुप जगासमोर ठेवण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. मनाचे शास्त्र जाणण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कुटुंब आणि भारतीय संस्कृतीचा लौकीक जगात होईल असा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading