दिव्यांगांना मोफत हात, पाय आणि कॅलिपर वाटप
पुणे : भारत विकास परिषद, एल अँड टी कंपनी आणि ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांच्यावतीने ७५ दिव्यांगांना खराडी येथील ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणामध्ये मोफत हात, पाय आणि कॅलिपर वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अत्याधुनिक मॉड्युलर पाय यावेळी गरजूंना देण्यात आले.
यावेळी भारत विकास परिषदेचे विनय खटावकर, एल अँड टी कंपनीचे संजय देवघरे, ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील, सचिव उमा ढोले पाटील उपस्थित होते.
विनय खटावकर म्हणाले, अत्याधुनिक मॉड्युलर पायाची किंमत बाजारात ५० ते ७५ हजार रुपये असते. तो पाय या शिबिरामध्ये गरजूंना मोफत देण्यात येतो.
सागर ढोले पाटील म्हणाले, समाजामध्ये असे अनेक अपंग लोक आहेत, ज्यांना उपचार आणि आवश्यक साधने मिळू शकत नाहीत. त्यामुळे या रुग्णांवर उपचारासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी हात, पाय आणि कॅलीपर देण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स, ढोले पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी यांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
