दोन जिवलग मैत्रिणींनी केली एकाच दिवशी आत्महत्या; हडपसर येथील धक्कादायक प्रकार
पुणे : बालमैत्रीणाच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्याने दुसऱ्या मैत्रिणीने त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. हडपसरमधील शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील क्रिस्टल सोसायटी या इमारतीत काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. एकाच दिवशी दोन्ही मैत्रीणींनी अशाप्रकारे आयुष्य संपवल्याने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका हरिश्चंद्र भागवत आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड अशी या मैत्रिणींची नावे आहेत. हडपसरच्या शेवाळवाडी परिसरात राहणाऱ्या सारिका आणि आकांक्षा या दोघी बालमैत्रीणी होत्या. काही कारणामुळे सारिका हिनं तिच्या राहत्या काल (13 सप्टेंबर) रात्री सात वाजण्याच्या सुमारास घरी साडीच्या साहाय्यानं गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तिचा मृतदेह रूग्णवाहिकेमधून नेण्यात आला. यावेळी आकांक्षाने ते पहिलं आणि बालमैत्रीणाच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्यानं तिनं त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्यानं तिचाही मृत्यू झाला.
दरम्यान, दोन्ही मुलींच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.
