वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् लंडन तर्फे ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टचा सन्मान
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सुरु असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल तसेच कोविड काळात केलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् लंडन तर्फे दगडूशेठ गणपती ट्रस्टला सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् लंडन चे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चा गौरव नुकताच करण्यात आला. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी हा सन्मान स्विकारला.
जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना, जय गणेश रुग्णसेवा अभियान, जय गणेश हरित वारी अभियान यांसारख्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ट्रस्ट मानवसेवेचे मंदिर उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय कोविडच्या काळात समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देत आधार देण्याचे काम ट्रस्टने केले आहे. त्यामुळे ट्रस्टला वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्डस् लंडनतर्फे सर्टिफिकेट आॅफ अॅप्रिसिएशन देण्यात आले आहे.
