Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पं. आनंद भाटे यांनी गायनातून भरले संगीत मैफिलीत ‘आनंदरंग’

पुणे  : शास्त्रीय-उपशास्त्रीय  संगीत, नाट्यगीत, अभंगांचे दर्जेदार सादरीकरण, गायनासाठी  विविध वाद्यांची मिळालेली दमदार साथसंगत आणि उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफिलीला रसिकांकडून जोरदार टाळ्यांच्या गजरात मिळालेली दाद, अशा उत्साही वातावरणात ‘आनंदरंग’ ही विशेष संगीत मैफल संपन्न झाली.

साधना कला मंच ही संस्था गेल्या तीस वर्षांपासून शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, नाट्य, नृत्य अशा विविध कलांशी निगडीत कार्यक्रमाचे आयोजन करते. भारतीय अभिजात कलांसाठी कार्य करणाऱ्या या संस्थेस तिच्या रौप्य महोत्सवी वर्षात महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे शास्त्रीय संगीतातील उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी अनुदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माजी मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. संस्थेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त नुकतेच कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ‘आनंदरंग’ संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती.  कार्यक्रमात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक पं. आनंद भाटे यांनी आपले गायन सादर केले.

कार्यक्रमाची सुरवात शास्त्रीय संगीत गायनाद्वारे झाली. यावेळी पं. भाटे यांनी राग पुरीयाधनश्रीमध्ये झपतालात ‘पार करो अरज सुनो ही’, तीन तालात ‘पायलिया झनकार मोरी’ तर पिलू रागामध्ये ‘अब आयो घनश्याम’ या  बंदिशी सादर केल्या. बालगंधर्व यांच्या ‘नरवर कृष्णा समान’ या नाट्यगीत सादरीकरणाने कार्यक्रमाच्या पूर्वाधाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरवात उपशास्त्रीय संगीताने करण्यात आली. यावेळी पं.भाटे यांनी  बसंतबहार रागातील बंदिश सादर केली.  पं. राम मराठे यांची विशेष रचना असलेली बंदिश आणि नाट्यगीत ‘बसंत की बहार आयी’, उस्ताद बडे गुलाम आली खान यांनी अजरामर केलेल्या ‘का करु सजणी आये न बालम’  ठुमरी आणि पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांच्या ‘बाजे मुरलिया बाजी’ या रचनेच्या  सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.

यानंतर पं. आनंद भाटे यांनी छोटा गंधर्व, संत तुकाराम यांच्या अभंगाची मेडली सादर केली. यामध्ये ‘योगिया दुर्लभ तो म्या देखिला सजणी’, ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या अभंगांचा समावेश होता. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांची खास छाप असलेला ‘माझे माहेर पंढरी’ ही अभंग रचना सादर करण्यात आली.  कार्यक्रमाची सांगता ‘अगा वैकुंठीच्या राया’ या भैरवीने झाली, या सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उदंड प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात पं. आनंद भाटे यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला ), माऊली टाकळकर (टाळ), ललित देशपांडे आणि स्नेहल देशपांडे-जायदे यांनी तानपुरासाठी साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  वसुधा कर्दळे यांनी केले, तर साधना कला मंच’चे संस्थापक अध्यक्ष विजय दांडेकर आणि त्यांच्या पत्नी ज्योती दांडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading