विसर्जन मिरवणूकीत पुणेकर चप्पल तुटेपर्यंत नाचले; तब्बल 6 टेम्पो भरून सापडली पादत्राणे
पुणे : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक यंदा तीस तास सुरु होती. तब्बल दोन वर्षांनी झालेल्या या मिरवणुकीत पुणेकर लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या गणपती विसर्जन मिरवणूकीला पुणेकर चप्पल तुटेपर्यंत नाचल्याचे समोर आले आहे. कारण दुसऱ्या दिवशी गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यामध्ये तब्बल सहा टेम्पो भरून चपला आणि बूट माहापालिकेच्या स्वच्छता विभागाला मिळाली आहेत.
गणेश विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, लाल बहादूर शास्त्री रोड, कर्वे रोड, जंगली महाराज रोड मार्गे निघाली त्या सगळ्या रस्त्यांवर फक्त लोकंच दिसत होती. याच मिरवणुकीनंतर मात्र 32 टन कचरा जमा झाला. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या 1 हजार 37 कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीन तासांत पुणे परिसराची स्वच्छता केली. यात फक्त कचराच नाही तर पुणेकरांच्या चपला आणि बुटांनी देखील तब्बल सहा टेम्पो भरले.
विसर्जन मिरवणुकीनंतर पुण्यातील रस्ते साफ करण्याला सुरुवात झाली.
तीस तास सलग हजारो लोकं रस्त्यांवर बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले होते. हजारो लोकांनी यंदा मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली होती. अनेकांना फोटो काढायचे होते तर अनेक लोक उत्साहाने नाचण्यासाठी सहभागी झाले होते. अलका टॉकीज चौकात माणसांचा पूर आला होता. मात्र याच मिरवणुकीनंतर अनेक पुणेकर अनवानी पायानेच घरी गेले कारण दुसऱ्या दिवशी शहराची स्वच्छता करताना चपला आणि बुटांनी तब्बल सहा टेम्पो भरले होते.
