क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे पुण्यात साकारणाऱ्या गृहप्रकल्पांच्या २१ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनचे आयोजन
पुणे : पुण्यात घर खरेदी करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध होत आहे. शहरातील तब्बल ६० रेरा नोंदणीकृत बांधकाम व्यावसायिकांच्या पुणे महानगर परिसरात विविध ठिकाणी साकारात असलेल्या सुमारे १००० गृहप्रकल्पांची माहिती घर खरेदीदारांना एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे. निमित्त आहे क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे आयोजित २१ व्या ‘मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’ या गृहप्रकल्पांच्या भव्य प्रदर्शनाचे. हे प्रदर्शन १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत रेंज हिल्स येथील कृषी महाविद्यालय मैदानावर भरणार असून किफायतशीर ते आलिशान अशा सर्व श्रेणीतील सदनिकांचे विविध पर्याय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांसाठी उपलब्ध असतील.
या प्रदर्शनाचे उदघाटन १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया आणि क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष सुनील फुरदे उपस्थित राहतील अशी माहिती प्रदर्शनाच्या आयोजन समितीचे मुख्य समन्वयक जे. पी. श्रॉफ यांनी कळवली आहे.
तब्बल ५,६७५ स्क्वेअर मीटर परिसरात भरविण्यात येणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांना विनामूल्य नोंदणी करता येणार आहे. प्रदर्शनात १३ बँक सहभागी होणार असून, त्यामध्ये आयसीआयसीआय, एचडीएफसी होम लोन, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे. तसेच बांधकाम क्षेत्रातील बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय), आयजीबीसी आणि पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीरिंग आणि रीसर्च फौंडेशन (पीसीईआरएफ) या तीन संस्था सहभागी होणार आहेत. आतापर्यंत १०००० नागरिकांनी यासाठी ऑनलाईन नावनोंदणी केली असून, सुमारे १५००० नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
करोनानंतर पहिल्यांदाच हे प्रदर्शन आयोजित केले जात असून, नागरिक प्रत्यक्ष स्वरूपात प्रदर्शनास भेट देऊ शकतील. पूर्णपणे ग्राहक केंद्रित असलेल्या या प्रदर्शनात वॅले पार्किंगची सुविधा, फूड झोन, लहान मुलांसाठी किडस झोन अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, विविध सांगीतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळेच नागरिक सहपरिवार या प्रदर्शनाचा आनंद घेऊ शकतील. नागरिकांना प्रकल्पाबाबत अधिक माहिती घेता यावी, प्रकल्प मालकांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी स्वतंत्र सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ऑनलाईन नोंदणी करून या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीस एक छत्री भेट म्हणून दिली जाणार आहे. तसेच लकी ड्रॉ’द्वारे दररोज एका भाग्यवान व्यक्तीस एक अथर इलेक्ट्रिक दुचाकी भेट म्हणून दिली जाणार आहे. ही निवड संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर कळवण्यात येईल.
प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्टॉल’ला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल पुणे चाप्टर (आयजीबीसी ) आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्यातर्फे ‘सस्टेनेबल स्टॉल’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त विविध कार्यशाळा आणि चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.
