Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

शिवाजी विद्यापीठाच्या पेपरफुटी व परीक्षा निकालातील गोंधळाबाबत अभाविप ने घातला  कुलसचिवांना घेराव

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२ च्या उन्हाळी सत्र परीक्षा मागील दोन महिन्यामध्ये पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये अनेकदा विविध विद्या शाखांचे पेपर फुटल्याचे निदर्शनास आले. या विषयाबाबत अभाविपणे मागील आठवड्यात आंदोलन केले होते व संबंधित महाविद्यालय, प्राध्यापक, इतर कर्मचारी तसेच विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक असणारे डॉ. अजितसिंह जाधव यांच्या वरती समिती बसून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली होती, परंतु त्यावर मा. कुलगुरू महोदय डॉ. डी टी शिर्के यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे आज विद्यार्थी परिषदेला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागले.

या सर्व प्रकरणात भर म्हणूनच की काय विविध विद्याशाखांचे निकाल लागत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अनेक विद्यार्थी हे पेपरला हजर असून देखील ऑनलाइन निकालामध्ये गैरहजर दाखवले गेले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना पेपर बरोबर लिहूनसुद्धा शून्य गुण मिळाले आहेत, तर काही विद्यार्थ्यांना समान गुण मिळून त्यातील एक विद्यार्थी पास तर दुसरा नापास असे देखील प्रकार घडलेले अभाविपच्या निदर्शनास आलेले आहे. विद्यापीठाचे अनेक पेपर हे वेळेआधी फुटल्या मुळे फेर परीक्षा विद्यापीठ घेत आहे.
बहुतांश विद्यार्थी हे पदवी नंतर पुढे प्रवेश घेण्याच्या तयारीत असताना विद्यापीठ व परीक्षा विभागाच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांची कॅम्पस सिलेक्शन च्या माध्यमातून विविध खाजगी कंपन्यांमध्ये निवड झालेली असून आता विद्यापीठाच्या चुकीमुळे निकालात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना या नोकऱ्यांपासून मुकावे लागणार का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाच्या विरोधात प्रचंड रोष आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन डिस्क्रिप्टइव्ह पद्धतीने पेपर घेतले असून फक्त शिवाजी विद्यापीठाने ऑफलाईन MCQ पद्धतीने पेपर घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालात हा गोंधळ निर्माण झाला आहे. विधी शाखेच्या इंटेलेकच्युअल प्रॉपर्टी राईट्स (IPR) या विषयाच्या पेपरची काठिण्य पातळी जास्त असल्याचे सांगून विद्यापीठाने हा पेपर जवळपास एक महिन्यानंतर घेतला पण प्रत्यक्षात हा पेपर फुटलेला होता. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागला आहे, या विषयाची दखल राज्यपालांनी देखील घेतली आहे.

अनेक विद्याशाखांचे निकाल लागून एक महिना होत आला असून अद्यापही त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल विद्यापीठाने जाहीर केलेला नाही. या सर्व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निदर्शनास आणण्यासाठी आज पैसा फेको हे आंदोलन करण्यास कार्यकर्ते गेले होते. पण कुलगुरू नसल्या कारणास्तव कुलसचिवांना घेराव घालण्यात आला. यावेळी अभाविप प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे यांनी कुलसचिवांना जाब विचारला की, पेपर फुटी प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाही कधी करणार? पुढे बोलताना ते म्हणाले की, तसेच परीक्षा नियंत्रक हे निष्क्रिय असून त्यांना परीक्षा विभागाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे विद्यार्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांच्यावर चौकशी समिती बसवून समितीचा निर्णय येईपर्यंत त्यांना विद्यापीठाच्या कामकाजापासून दूर ठेवावे. अन्यथा अभाविप यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.

तसेच निकालाबाबत अभाविपने खालील मागण्या केल्या आहे.
१. ज्या विद्यार्थ्यांच्या निकलामध्ये त्रुटी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाने ग्रेव्हीअन्स लिंक उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून एकही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही.
२. ज्या विद्यार्थ्यांना निकलामध्ये मिळालेले गुण समाधानकारक वाटत नाही किंवा शंका वाटत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकण व फोटोकॉपीची सोय विद्यापीठाने उपलब्ध करून द्यावी.
३. जे विद्यार्थी हजर असून देखील ऑनलाइन निकलामध्ये गैरहजर लिहून आलेले आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचे निकाल तात्काळ दुरुस्त जाहीर करावे.

यावेळी कोल्हापूर महानगर मंत्री दिग्विजय गरड, माधुरी लड्डा, अमोघ कुलकर्णी, दिनेश हुमनाबादे , गौरव ससे, सानिका पाटील, गणेश डुबल, पराग कुलकर्णी यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading