पुण्यातील विसर्जन मिरवणूक लाबंणार
पुणे:अवघ्या राज्याचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली पुण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा विक्रमी वेळ चालणार अशी शक्यता आहे. शहरातील मंडई, रंगारी, जिलब्या मारुती, दगडूशेठ असे प्रमुख गणपती रात्री बारापर्यंत जागेवरच होते. त्यामुळे यंदाची मिरवणूक दुपारी तीनपर्यंत संपणार का अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी अनंत चतुदर्शीला विसर्जन मिरवणुकीतही याचा परिणाम दिसून आला. शहरातील लक्ष्मी रस्ता हा गणपती विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग असतो. शुक्रवारी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या विसर्जन मार्गावर दणदणाटाने आवाजाची
मर्यादा ओलांडली. डीजे, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.
विसर्जन मार्गावर मंडळे मंदगतीने पुढे सरकत आहे. पोलीस सक्रीय झाल्यास विसर्जन सोहळा दुपारी दोनपर्यंत संपेल अन्यथा तीन किंवा चार वाजेपर्यंत हा सोहळा चालेल. अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरू आहे.
