शिवाजीनगर “मेट्रो”तील कर्मचारी दीड महिन्यापासून बेपत्ता अद्याप तपास नाही
पुणे – पुणे शहरात मेट्रो विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. यासाठी विविध परप्रांतीय तरुण मेट्रोमध्ये नोकरी करत आहेत. शिवाजी नगर मेट्रो येथे काम करणारा दीपक रंजन परिदा उर्फ पप्पू (वय 27, सध्या रा. कळस विश्रांतवाडी पुणे मूळचा- ओडिशा)हा 19 जुलै 2022 पासून बेपत्ता झालेला आहे. त्याच्या लहान भावाने याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवलेली आहे. गंभीर बाब म्हणजे दीड महिन्यानंतर देखील अद्याप या परप्रांतिय तरुणाचा बेपत्ता झाल्यानंतर तपास लागलेला नाही.

याप्रकरणी त्याच्या लहान भावाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार महिन्यांपासून शिवाजी नगर मेट्रो येथे नोकरी मिळाल्यामुळे ते पुण्यात वास्तव्यास आहेत. गावाकडील इतर 4 व्यक्तींसह विश्रांतवाडी कळस येथे ते भाड्याच्या खोलीत एकत्र राहतात. 19 जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दीपक नेहमीप्रमाणे अंघोळ करून घरातील कपड्यावरच बाहेर पडला. त्यानंतर आम्ही सर्वजण शिवाजीनगर येथे कामावर गेलो. रात्री उशिरापर्यंत दीपक कामावर व घरी देखील न आल्यामुळे आम्ही विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. घराजवळील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दीपक जाताना दिसत आहे मात्र त्यापुढे त्याचा कुठलाही ठावठिकाणा लागलेला नाही.
विश्रांतवाडी पोलिसांनी परिसरातील आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज व इतर तपास केलेला आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस पुरावा यासंदर्भात मिळालेला नाही. दीपक बेपत्ता होऊन दीड महिना झाल्यामुळे त्याचा लहान भाऊ तसेच गावाकडील आई-वडील, लहान बहीण तसेच नातेवाईक हे अतिशय चिंतेत आहेत. नोकरीसाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यानंतर दिपक सारखा तरुण अचानक बेपत्ता होतो. त्याचा कुठलाही शोध लागत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे. यासंदर्भात मेट्रो कंपनीकडून देखील खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या कंपनीत नोकरी करणारा कर्मचारी बेपत्ता होतो या बाबत कंपनीने देखील शोध घेणे किंवा तपासासाठी मदत करणे अपेक्षित आहे. दीपक घराबाहेर पडताना त्याच्याकडे मोबाईल पैसे अथवा कुठलीच वस्तू नव्हती. त्यामुळे त्याचा तपास करणे आणखी अवघड झालेले आहे. उपलब्ध माहितीवरून बेपत्ता दिपक चा विश्रांतवाडी पोलीस तपास करत आहेत.
