हिंदूराष्ट्र सेनेचे पदाधिकारी तुषार हंबीर यांच्यावर ससून रुग्णालयात हल्ला
पुणे: हिंदूराष्ट्र सेनेचे पदाधिकारी तुषार हंबीर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. ससून रुग्णालयात हा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाल्याचे कळते आहे. तुषार हंबीर यांच्यावर मकोका लावण्यात आला असून ते येरवडा तुरुंगात होते. उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर चौघांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
हंबीर यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने तगडा पोलीस बंदोबस्त आहे. असं असताना ससून रुग्णालयात शिरून हल्लेखोरांनी हंबीर यांच्यावर हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. हंबीर यांच्यावर 2019 साली येरवडा कारागृहात हल्ला झाला होता. हंबीर यांच्यावर हडपसरमध्ये मोहसीन शेख नावाच्या तरुणाची हत्या केल्याचा आरोप आहे. हंबीर तुरुंगात असताना त्यांच्यावर शाहरूख शेख याने हल्ला केला होता. हंबीर हे आजारी असल्याने 25 ऑगस्टपासून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.
