पुणे गणपती विसर्जन मिरवणूक याचिका हायकोर्टाने फेटाळली
पुणे: पुण्यातील गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीवरून पुण्यातील काही गणेश मंडळांनी कोर्टात एक याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा धक्क बसला असून यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा वाद आता कोर्टात गेला असून, विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे पाच गणपती जातील त्यानंतर लहान गणपती जाणार ही बंधनं का? असा सवाल गणेश मंडळांकडून करण्यात आला होता. यासंदर्भातील याचिका दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
पुण्यातल्या गणपती विसर्जनाचा सोहळा आता काही दिवासांवर आला आहे. अशातच मानाच्या मिरवणुकींवरून सुरु झालेल्या वादावरील याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. मुंबई हायकोर्टात आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक झाल्यानंतर अन्य मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्याच्या परंपरेला यावेळी ‘बढाई समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी उच्च न्यायालायात आव्हान दिलं होतं. या अटी आणि परंपरा संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे, असा दावा करत बढाई यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं. मानाच्या गणपतीआधी छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी होती.
1893 ला लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. पण दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1894 ला आधी विसर्जन कोणी करायचं यावरून गणेश मंडळांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद लोकमान्य टिळकांपर्यंत पोहचला. त्यावर त्यांनी पुण्याचं ग्रामदैवत म्हणून विसर्जनाचा पहिला मान कसबा गणपती, ग्रामदेवता म्हणून दुसरा मान तांबडी जोगेश्वरी गणपतीचा असेल असं ठरवण्यात आलं. पुढे मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती, चौथा मान तुळशीबाग आणि पाचवा मान केसरीवाडा या गणेश मंडळांकडे असेल, अशी प्रथा रूढ झाली.
