राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद मिळेल”
मुंबई : भारतीय ऑलिम्पिक संघ व गुजरात ऑलिम्पिक असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आणि गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने देशाची प्रतिष्ठित ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गुजरात येथे दि . २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर , २०२२ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे . भारतीय ऑलिम्पिक संघाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या आठ क्रमांकाचे महाराष्ट्रातील पुरुष व महिला संघ एकुण ३४ क्रीडा प्रकारात असे ८०० जणांचे पथक या स्पर्धेसाठी पाठविणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असल्यामुळे गुजरातमध्ये होणाऱ्या ३६ व्या आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वाधिक पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळेल असा आत्मविश्वास महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव श्री. नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या तयारीच्या संदर्भात विविध खेळांच्या राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस मार्गदर्शन करताना श्री. शिरगावकर म्हणाले,” माझा संघ माझी जबाबदारी हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवीत प्रत्येक खेळाच्या संघटनांनी आपल्या खेळाडूंची उत्तम रीतीने तयारी करावी. खेळाडूंच्या तयारीसाठी राज्य शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न ठेवता संघटनांनी या स्पर्धेत आपल्या खेळाडूंना अधिकाधिक पदके कशी मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करावे.
श्री. शिरगावकर पुढे म्हणाले की, ज्या संघटनांनी आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंची नावे दिलेली नाहीत त्यांनी लवकरात लवकर ही नावे सादर करावीत.
या बैठकीत श्री शिरगावकर यांनी यापूर्वी सुरू झालेल्या काही संघांच्या शिबिरांचा आणि संघ निवडीबाबत घेण्यात आलेल्या चाचण्यांचाही आढावा घेतला. त्यावेळी खेळाडू व अन्य सपोर्ट स्टाफची यादी, प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य व सुविधा इत्यादी सर्व तपशील महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेकडे द्यावा, असे सांगितले. बालेवाडी, पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत ज्यांना शिबिर आयोजित करायचे आहे त्यांनी या संदर्भातील सर्व माहिती संबंधित शासकीय क्रीडाधिकाऱ्यांकडे द्यावी म्हणजे त्यानुसार या क्रीडा नगरीत व्यवस्था करणे सोयीचे होईल.
या बैठकीस मार्गदर्शन करताना राज्याचे क्रीडा आयुक्त श्री ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले की, बालेवाडीत शिबिरासाठी कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत याची आम्ही काळजी घेत आहोत मात्र क्रीडा संघटनांनी लवकरात लवकर त्यांना खेळाडूंची नावे व अन्य माहिती द्यावी कारण क्रीडा नगरीत नियमितपणे अनेक खेळांच्या स्पर्धा व सराव शिबिर सुरू असतात. तसेच येथे प्रशिक्षण घेणारे खेळाडू वसतिगृहातही राहत असतात. राज्यात अन्य ठिकाणी शासनाच्या ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आहेत तेथेही स्पर्धा पूर्व शिबिर आयोजित करणे शक्य आहे. अशा ठिकाणी संबंधित खेळांच्या संघटनांनी शिबिर आयोजित केल्यास तेथेही शासनाचे सहकार्य मिळेल.
