फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धेमुळे भारतात महिला फुटबॉलची लोकप्रियता शिखराला पोहोचेल – भारतीय महिला संघाची कर्णधार आशालता देवी हिला विश्वास
पुणे : महिला फुटबॉलच्या विकासाकडे लक्ष्य देण्यासाठी भारतीयांना सध्याचा काळ सर्वोत्तम आहे आणि संपूर्ण देश फुटबॉलच्या जागतिक उत्सवासाठी सज्ज होत असताना फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ ही स्पर्धा त्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त ठरणार आहे. संपूर्ण जगभरातील 17 वर्षांखालील महिला खेळाडू 11 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत भारतात खेळणार असल्यामुळे भारतीय क्रीडा प्रेमींना सर्वोच्च दर्जाच्या स्पर्धात्मक फुटबॉलचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
आगामी होणाऱ्या खास स्पर्धेविषयी बोलताना भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार आशालता देवी म्हणाली की, फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ या स्पर्धेमुळे भारत हा महिला फुटबॉलचे महत्वाचे केंद्र बनणार आहे. भारतात अनेकांना अद्यापही महिला फुटबॉलबद्दल फारशी माहिती नाही. परंतु या संपूर्ण स्पर्धेचे टेलिव्हिजनवर प्रक्षेपण होणार असल्यामुळे महिला फुटबॉलने किती मजल मारली आहे हे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना कळून चुकेल. सध्या फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धा म्हणजे भारतातील महिला फुटबॉलच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल.
आशालता देवी हिने भारतातील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ या स्पर्धेला तुमच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. तुमच्या प्रोत्साहनामुळेच खेळाडूंचे मनोधैर्य आणि आत्मविश्वास उंचवणार आहे. ज्यांची मुले किंवा मुली फुटबॉल खेळत आहेत, त्यांच्या पालकांनाही या स्पर्धेला आणि आम्हांला पाठिंबा देण्याचे मी आवाहन करते.
महिला फुटबॉलविषयी देशातील नागरिकांचा दृष्टिकोन कसा बदलत गेला आहे, याविषयी बोलताना ती म्हणाली की, मुलींना फुटबॉल खेळताना पाहणे, हे यापूर्वी देशातील लोक स्वीकारत नव्हते. मात्र आता माझ्या सभोवतालचे अनेकजण आम्हाला पाठिंबा देताना दिसतात. कोणत्याही स्पर्धेनंतर मी माझ्या गावी परत जाते, तेव्हा माझे प्रचंड स्वागत केले जाते. अनेक पालक आता माझ्याकडे येतात आणि आपल्या मुली फुटबॉल खेळू शकतील का अशी विचारणा करतात. मी फुटबॉल खेळू लागले आणि भारताची कर्णधारही झाले. त्यामुळे हा बदल घडून आला आहे.
भारतीय महिला फुटबॉल संघ आपले सर्व साखळी सामने भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम येथे खेळणार आहे. भारताचा समावेश अ गटात असून ब्राझील, मोरोक्को आणि अमेरिका यांचा या गटात समावेश आहे. फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धेतील सामने गोवा आणि नवी मुंबई येथेही खेळले जाणार आहेत.
