Thursday, June 18, 2026
Latest NewsLIFESTYLE

‘ब्रश स्ट्रोक्स २’ चित्रप्रदर्शनात पहायला मिळणार १७ कलाकारांच्या कलाकृती  

पुणे  :  कलेला कोणतंच वय नसतं हे खरचं आहे, याची अनुभूती तुम्हाला ‘ब्रश स्ट्रोक्स २’ या चित्र प्रदर्शनामध्ये येईल. वेगवेगळ्या वयोगटातील १७  चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृती पाहण्याची पर्वणी या अनोख्या प्रदर्शनात चित्र रसिकांना मिळणार आहे. कलाश्री आर्ट्स तर्फे आयोजित हे चित्रप्रदर्शन ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत पत्रकार नगर जवळील दर्पण कलादालन येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत होणार असून, ते सर्वांसाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनात कलाश्री आर्ट्स’चे संस्थापक निलेश पवार आणि त्यांचे १६ शिष्य यांच्या सुमारे ५० हून अधिक कलाकृती पहायला मिळतील. झाडाखाली बासुरीवादनाचा आनंद घेणारे राधाकृष्ण, वाराणसी येथील घाट, काही सांगीतिक कलाकृती तर काही प्रतीकात्मक कलाकृतींचा समावेश या प्रदर्शनात असणार असून, नाईफ वर्क, ब्रश वर्क, स्प्रे टेक्निक, टेक्चर वर्क अशा विविध प्रकारच्या तंत्रांचा वापर करून या कलाकृती रेखाटण्यात आल्या आहेत. यापैकी काही कलाकृती या कलाकारांच्या स्वतःच्या रचना आहेत, तर काही इतर चित्रकारांच्या चित्रांचा संदर्भ घेत साकारलेल्या ‘स्टडी पेंटिंग’ अर्थात ‘अभ्यास रचना’ आहेत.
या प्रदर्शनाचे उदघाटन सहभागी कलाकारांच्या हस्ते आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता कलादालनात होणार आहे. यामध्ये आरती किर्लोस्कर, शुभांगी मांजरेकर,शीतल काळभोर, राजश्री जंगले, सुहास जंगले, मंजुश्री भणगे, नितीन भणगे, ज्योती कुरणे, करुणा चावला, मेघा शर्मा, पूनम गरुड, अंजली कैलाट, बानी खुराणा, प्रवीण किणी,  परितोष साकोरकर, शरण्या साकोरकर आणि निलेश पवार यांचा सहभाग आहे.
पवार म्हणाले, “  ‘ब्रश स्ट्रोक्स’ या चित्रप्रदर्शनाची यंदा दुसरी आवृत्ती आहे. २०१९ साली पहिल्यांदा हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. दर दीड वर्षानी हे चित्रप्रदर्शन भरविण्याचा आमचा मानस आहे. करोनामुळे यामध्ये खंड पडला असला, तरी यापुढे निश्चितच हे प्रदर्शन नियमितपणे भरविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यंदा प्रदर्शनात १५ वर्षे वयापासून ते अगदी ७० वर्षांहून अधिक वयोगटातील कलाकारांनी सहभाग नोंदविला आहे. चित्रकला हा एक  दृश्य कलाप्रकार असून, तो  केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित राहू नये. इतर लोकांनाही या कलेची कलाकृतीची माहिती व्हावी आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.’’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading