हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ”मी माझ्या पतीच्या निधनानंतर अनेक वेळा अभिनय सोडण्याचा विचार केला”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारणा-या हिमानी शिवपुरी या तीन दशकांपासून भारतातील सर्वात प्रतिभावान व उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या काही सर्वात ब्लॉकबस्टर्स चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपल्या सर्वोत्तम अभिनय क्षमतांसह लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हिमानी शिवपुरी यांना प्रसिद्धी, भाग्य व मान्यता मिळवून दिलेल्या रंगभूमीची खूप आवड आहे. आमच्यासोबत गप्पागोष्टी करताना त्यांनी अभिनेत्री म्हणून त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबाबत सांगितले.
१. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून तुमचा प्रवास कशाप्रकारे सुरू झाला?
ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्सला जाणार होते. तरीही, त्याच वेळी माझी एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)साठी निवड झाली. मला एनएसडीला जायचे आहे असे मी माझ्या कुटुंबियांना सांगितले तेव्हा सर्वजण नाराज झाले. सुरुवातीला माझ्यावर बॉलिवूडची नकारात्मक छाप होती. मला चित्रपटात यायचे नव्हते. माझा असा विश्वास होता की, बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना प्रदर्शनात्मक दाखवणे अपेक्षित होते. माझे दिवंगत पती ज्ञान शिवपुरी, ज्यांनी मला चित्रपट करण्यास प्रवृत्त केले, त्यांना भेटेपर्यंत मी नाटक आणि रंगभूमीवर काम करण्यात समाधानी होते. मी ऑडिशन देण्यास सुरुवात केली आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘परदेस’ व ‘उमराव जान’ यांसारख्या उत्कृष्ट क्लासिक्समध्ये काम केल्याबद्दल मी कृतज्ञ व भाग्यवान आहे.
२. तुम्हाला करिअर म्हणून अभिनय निवडताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?
मी उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून आले आणि नंतर देहरादूनला शिफ्ट झाले. त्यावेळी, मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करणे पुढे ढकलले आणि कोणीही माझ्या करिअरच्या निवडीला गांभीर्याने घेतले नाही. मला अनेकदा प्रश्न विचारला जायचा, “क्या नौटंकी करोगी?” अभिनय हा एक गंभीर व्यवसाय आहे आणि अभिनेता होण्यासाठी औपचारिक प्रशिक्षण घेतले पाहिजे, हे मला माझ्या कुटुंबियांना पटवून द्यावे लागले. म्हणून मी एनएसडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, ज्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सुदैवाने माझे वडील हरिदत्त भट्ट यांनी मला पाठिंबा दिला. तरीही, अभिनय किंवा नाटक हे व्यवसाय म्हणून निवडण्यासाठी काही कौशल्ये आणि तितकेच कठोर परिश्रम आवश्यक आहेत हे माझ्या कुटुंबाला समजावून सांगणे तितके सोपे नव्हते.
३. आम्हाला रंगभूमीवरील तुमच्या प्रवासाबाबत सांगा.
मी सात वर्षांची असताना एका नाटकात भाग घेतला होता, पण त्याबद्दल फारसं आठवत नाही. तेव्हापासून, मी रंगभूमीशी संलग्न राहिली आहे, जे माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात देखील सुरू ठेवले. रसायनशास्त्रातील माझ्या एमएससी शिक्षणादरम्यान, मी बेटलॉट ब्रेच यांचे “द थ्री पेनी ऑपेरा” हे नाटक सादर केले. कार्यशाळा आयोजित करण्यासाठी एनएसडीचे कर्मचारी होते. तेव्हा मला माझ्या आयुष्यात हेच करायचे आहे हे कळले. तेव्हाच मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी रंगभूमीवर जी काही नाटके केली ती माझ्यासाठी मौल्यवान आहेत, पण “मित्रों मरजानी” नावाचे एक नाटक मी देशभरात सादर केले आणि ते माझ्या अविस्मरणीय नाटकांपैकी एक आहे.
४. बॉलिवूड व टेलिव्हिजनवर यश मिळाले असताना देखील तुम्ही आजही रंगभूमीशी संलग्न आहात. यासाठी तुम्हाला कोणती गोष्ट प्रेरित करते?
रंगभूमी हे नेहमीच माझे पहिले प्रेम असेल आणि पडद्यावर अभिनय हे माझे शेवटचे प्रेम असेल. मी रंगभूमी सोडू शकत नाही. एक कलाकार म्हणून मला दोन्ही क्षेत्रांमध्ये एकत्र काम केल्याबद्दल समाधान वाटते आणि मी कधीच माध्यमाचा विचार केला नाही, फक्त चांगल्या भूमिका करण्याची इच्छा होती. स्वतःवर आत्मविश्वास आणि त्याचा पाठपुरावा करण्याची जिद्द असली पाहिजे. मी फक्त भारतभरातील रंगभूमीमध्ये कार्यक्रम करत नाही तर विविध विद्यापीठांमध्ये कार्यशाळा देखील घेते. स्वत:ला टवटवीत करण्यासाठी स्पामध्ये जाणा-या महिलांप्रमाणे मला रंगभूमीवर जायला आवडते.
५. तुमची भूमिका कटोरी अम्मा घराघरामध्ये लोकप्रिय बनली आहे. मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ सुरू झाली तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे प्रेम मिळण्याची अपेक्षा केली होती का?
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’सोबतचा माझा प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. मालिका सुरू झाल्यापासून हा प्रवास उत्तम राहिला आहे. मला कटोरी अम्मासाठी विचारण्यात आले आणि आता लोक मला सेटवर अम्माजी म्हणून हाक मारतात. मी योगेशला रंगभूमीच्या दिवसांपासून ओळखते, म्हणून आमच्यामधील केमिस्ट्री उत्तम होती आणि कामनासोबत देखील केमिस्ट्री उत्तम होती, मी पहिल्यांदाच त्यांच्यासोबत काम करणार होती. माझ्या मते, कटोरी अम्मा प्रबळ आई व्यक्तिमत्त्व आहे. ती उत्साहपूर्ण आहे आणि तिला स्वत:चा मार्ग कसा काढावा हे उत्तमरित्या माहित आहे. ही भूमिका यशस्वी आहे आणि मी ते सुरूवातीलाच ओळखले होते. ही मातृत्वासह बहुआयामी भूमिका आहे. तिच्या घरामधील सदस्यांसोबतचे नाते मला खूप आवडते. प्रेक्षक आता मला प्रेमाने कटोरी अम्मा म्हणून हाक मारतात, जो एक ट्रेडमार्क आहे आणि कायमस्वरूपी माझ्या हे लक्षात राहिल.
६. वास्तविक जीवनात तुमचे योगेश त्रिपाठी व कामना पाठक यांच्याशी मातृत्वाचे नाते आहे. कृपया आम्हाला त्याबाबत सांगा.
ते दोघेही अद्भुत आहेत, जे माझी उत्तम काळजी घेतात. मी आईप्रमाणे त्यांना ओरडते आणि त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. मी सेटवर असताना आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. योगेश व मी आमचे काम, कुटुंब आणि थिएटरच्या दिवसांवर चर्चा करतो, तर मी कामना पाठकसोबत रील बनवते. ते आसपास असताना मला कधीच कंटाळा येत नाही. फक्त तेच नाही तर संपूर्ण टीम मला अम्मा म्हणून संबोधते आणि माझे त्या सर्वांवर खूप प्रेम आहे.
७. तुम्हाला करिअरचा त्याग करावासा वाटला का?
खरे सांगायचे तर माझ्या पतीच्या अनपेक्षित मृत्यूनंतर मी अनेकदा अभिनय सोडण्याचा गंभीरपणे विचार केला. मला सर्व काही सोडून द्यायचे होते] कारण मला आई म्हणून शोमध्ये जाण्यासाठी माझ्या मुलाला घरी सोडताना वाईट वाटायचे. आमच्याकडे जास्त पैसे नसल्याने काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोलकात्यामधील एक प्रसंग आठवतो; आम्हाला प्रवास करणे परवडायचे नाही, म्हणून मी माझ्या मुलाला ट्रेनमध्ये स्तनपान केले. त्या दिवसांमधील ताण आणि अडचण, जसे कॉस्चुम ओले होऊ नये म्हणून स्तनपान करण्यास रेस्टरूमध्ये धावत जाणे असे क्षण विसरणे कठीण आहे. मुद्दा असा आहे की, महिलांना ते क्वचितच सोपे असते, मग त्या घरी असोत किंवा कामावर. वस्तुस्थिती अशी आहे की महिलांना घर असो किंवा काम, क्वचितच ते सोपे वाटते. पण मी कधीही हार न मानण्यास आणि जीवनातील सर्व अडचणींविरुद्ध नेहमी उभे राहण्यास शिकले.
