Duleep Cup Cricket Tournament – ईशान्य विभागीय संघ प्रमुख प्रशिक्षकपदी डॉ. अतुल गायकवाड यांची नियुक्ती
पुणे : पुण्यातील डॉ. अतुल गायकवाड यांची प्रतिष्ठीत दुलीप चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ईशान्य विभागीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. डॉ. गायकवाड हे सिक्कीम क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षण संचालक आहेत.
दुलीप चषक क्रिकेट स्पर्धा तीन हंगामांच्या अंतरानंतर पुन्हा आयोजित करण्यात येणार येत आहे. ही स्पर्धा ८ ते २५ सप्टेंबर या कालावधीत तामिळनाडू येथे विभागीय प्रकारात खेळली जाणार असून, २१ सप्टेंबर पासून कोइंबतूर येथे स्पर्धेचे अंतिम सामना खेळला जाईल.
ईशान्य विभागीय संघ हा पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होणार असून, डॉ. गायकवाड या संघाला प्रशिक्षण देणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य विभागीय संघाने सिक्कीम येथील दिमापुर येथे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीरास सुरवात केली आहे. डॉ. गायकवाड यांच्या नियुक्तीबाबत सिक्कीम क्रिकेट संघटनेचे सचिव श्वांग लामा भुटीया यांनी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिंनदन केले.
डॉ. गायकवाड यांनी भारतीय महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांना ३० वर्षांहून जास्त काळाचा प्रशिक्षण अनुभव आहे. बीसीसीआयचे माजी सहाय्यक शिक्षण प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली असून, ते बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमाणित ‘लेव्हल-थ्री’ उच्च कामगिरी प्रशिक्षक आहेत. डॉ. गायकवाड हे प्रमाणित योगिक विज्ञान शिक्षक आणि एनएलपी प्रमाणित प्रशिक्षक असून, इंग्लंड क्रिकेट बोर्डमध्ये ‘लेव्हल ४’ मास्टर प्रशिक्षक म्हणून काम करणारे ते पहिले भारतीय प्रशिक्षक आहेत.
