Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

सव्वादोन कोटीच्या ई टॉयलेट च्या अपयशानंतर आता प्रत्येकी ३६ लाखाच्या ११ टॉयलेटचा प्रस्ताव!

पुणे : राज्यातील पर्यटन सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये शंभर पेक्षा अधिक ठिकाणी आकांशी स्वच्छतागृहे बांधण्याचे प्रस्तावित आहे. याबाबत महाराष्ट्र नागरिक विकास अभियान संचालनालयाने सर्व महानगरपालिका आयुक्त व नगरपंचायत नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना यासाठीचे प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत यास अंशतः निधी दिला जाणार आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

आम आदमी पार्टीने याबाबत माहिती घेतली असता स्वच्छ भारत अभियान मार्गदर्शक सूचनानुसार स्वच्छ आणि चकाचक असलेल्या स्वच्छतागृहात पेपर नॅपकिन, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन व विल्हेवाट लावण्याचे मशीन आणि अंघोळीची सोय अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षापासून महिलांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न पुणे मुंबई सारख्या शहरात चर्चिला जात असून त्याबाबत समाधानकारक स्थिती नाही. त्यामुळे बंद पडणारी वेंडिंग मशीन आणि सुविधाऐवजी ‘सहज हाताळता येणारी व तांत्रिक ज्ञानाशिवाय देखभाल करता येणारी स्वच्छतागृह’ उभी करावीत. यापूर्वी शहरात अशीच १५ महागडी ई टॉयलेट उभी केली, त्यासाठी सव्वादोन कोटी खर्च झाला. परंतु ती देखभाली अभावी व महिलांना युजर फ्रेंडली नसल्याने म्हणजेच सुलभपणे वापरता येणारी नसल्याने बंद आहेत. त्यामुळे यावेळेस साधी सुटसुटीत स्वच्छतागृहे उभी करावीत तसेच एकत्रित स्वच्छतागृह ऐवजी छोटी पण अधिक संख्येची स्वच्छतागृहे असावीत. एकाच ठिकाणी महिलांची पाच व पुरुषांची पाच टॉयलेट एकत्रित न बांधता कमी सीट्स परंतु अधिक जागी उभी करावीत. स्वच्छ अभियान अंतर्गत बस स्टॉप, पेट्रोल पंप, मेट्रो स्टेशन, बाजार, पर्यटन स्थळ, दवाखाने आदी ठिकाणापासून पाचशे मीटरच्या अंतरात अशी स्वच्छतागृहे उभी करावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या स्वच्छतागृहांना निधी वापरताना पुणे महानगरपालिकेने पाच पुरुष व पाच महिला टॉयलेट बांधण्यासाठी ३६ लाखाचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे.  खरे तर पुणेकरांना विमानतळ व पंचतारांकित हॉटेल सारखी स्वच्छतागृहे अपेक्षित नाहीत. खर्चिक अति दिखाऊ स्वच्छतागृह ऐवजी जवळच्या अंतरात असलेली स्वच्छ व सुटसुटीत स्वच्छतागृहे उभी करावीत. स्वच्छतागृहवर प्रत्येकी ३६ लाख २८ हजार ही किंमत सुद्धा अवाजवी वाटते. सध्याचे बांधकाम दर पाहता हा खर्च अवाच्या सवा आहे.

तसेच याबाबत ‘पिंक टॉयलेट’ च्या धर्तीवर महिलांसाठी विशेष टॉयलेट उभी केल्यास त्याचा अधिक फायदा होईल. याबाबत महिला व आरोग्य संघटना तज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा अशी मागणी आम आदमी पार्टी चे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
 
आप चे राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केलेल्या मागण्या :
१)     खर्चिक, अधिक सीटच्या ब्लॉक ऐवजी छोटी स्वच्छतागृहे बांधावीत.
२)     महिलांसाठी विशेष ‘पिंक टॉयलेट’ च्या धर्तीवर स्वच्छतागृहे उभी करावीत   
३)     गर्दीच्या ठिकाणापासून पाचशे मीटर अंतरात स्वच्छतागृहे असावीत
४)     यापूर्वी बांधलेली, अस्तीत्वात असलेल्या टॉयलेटची व्यवस्था सुधारावी.
५)     या निर्णयप्रक्रियेत महिला, आरोग्य, वाहतूक क्षेत्रातील तज्ञ यांना सामील करावे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading