Tuesday, September 8, 2026
Latest NewsPUNE

आयली घिया हिची ‘फिट इंडिया चॅम्पियन’ म्हणून निवड

पुणे : नृत्य, क्रीडा आणि अभिनय या त्रिसूत्रीचा अवलंब करून सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत असलेली युवा अभिनेत्री, नृत्यांगना आयली घिया हिची केंद्र सरकारच्या वतीने ‘फिट इंडिया चॅम्पियन’ म्हणून निवड करण्यात आली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात झालेली निवड आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना आयली हिने व्यक्त केली आहे.
आरोग्यविषयक प्रश्नांवर जनजागृती करण्यात आघाडीवर असलेली आयली घिया हिची केंद्र सरकार स्पोर्टस्‌‍ ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (साई) गेल्या वर्षी ‘फिट इंडिया ॲम्बेसेडर’ म्हणून निवड केली होती. गेल्या वर्षभरात केलेल्या आरोग्यविषयक उपक्रमांची दखल घेऊन या वर्षीही पुन्हा एकदा आयली घिया हिला ‘फिट इंडिया ॲम्बेसेडर’ बनण्याचा मान मिळाला आहे. पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य डॉ. कविता आणि डॉ. प्रमोद घिया यांची  आयली ही कन्या असून तिला आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी घरातूनच बाळकडू मिळाले आहे.
युवांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या हेतूने ‘फिट इंडिया’ ही संकल्पना केंद्र सरकारमार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे. दैनंदिन जीवनात खेळ आणि व्यायामाचा अंतर्भाव करून प्रत्येक नागरिकाने स्वत:ला आरोग्यसंपन्न ठेवावे हा या मोहिमेचा उद्देश आहे, असे आयली आणि आयलीज्‌‍ डान्स अँड आर्ट ॲकॅडमीच्या उपाध्यक्षा डॉ. कविता घिया यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

‘फिट इंडिया ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाल्यानंतर  आयली हिने ‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या विविध उपक्रमांत सहभाग घेऊन जनजागृती करण्यावर भर दिला. खेळाडूंना प्रोत्साहन देणे, आरोग्यविषयक विविध उपक्रमांचा स्वत:च्या सर्जनशिलतेचा उपयोग करून प्रचार आणि प्रसार करण्यावर लक्ष केंद्रीत केले. तिच्या या कार्यामुळे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन यांच्या एचआरएक्स कंपनीची फिटनेस ॲम्बेसेडर बनण्याचा मानही तिला मिळाला आहे.
कोरोना काळात आयली हिने समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून ‘जर्नी टूवर्डस्‌‍ हेल्दी लाईफ’ हा अनोखा उपक्रम सुरू करून त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरांबरोबर चर्चा करून जनसामन्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यविषयक विविध समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रसिद्ध एकपात्री कलावंत संतोष चोरडिया यांच्याकडून प्रेरणा घेऊन आयली आणि डॉ. कविता घिया यांनी समाजातील विशेष घटकांसाठी आयोजित विविध उपक्रमात सहभागी होऊन त्यांना आनंद दिला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading