Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या साहित्यात समाजातील असंवेदनशीलतेचा मागोवा – उल्हास पवार

पुणे : समाजातील अनेक थोरा-मोठ्यांच्या भेटी घेऊन, त्यांच्याविषयी जाणून घेऊन डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांनी उत्तम लिखाण केले आहे. समाजात मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेल्या असंवेदनशीलतेचाही मागोवा त्यांनी आपल्या साहित्यातून घेतला असल्याचे प्रकर्षाने दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व वाङ्मयाचे जाणकार उल्हास पवार यांनी केले.


ज्येष्ठ साहित्यिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या ‘थोरामोठ्यांच्या सहवासात’ (व्यक्तिचित्रण), ‘कुणाच्या खांद्यावर’ (कथासंग्रह), ‘मातृप्रतिमा’ (कादंबरी) आणि ‘डॉ. स्नेहसुधा यांच्या निवडक कविता’ (कवितासंग्रह) या चार पुस्तकांचा प्रकाशन आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पवार अध्यक्ष पदावरून बोलत होते. डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. नीलिमा गुंडी, श्याम भुर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पवार म्हणाले, डॉ. कुलकर्णी यांचे साहित्य वाचल्यानंतर ज्येष्ठ साहित्यिकांचा मिळालेल्या सहवासाची आठवण झाली. येणाऱ्या संकटांवर मात करत आनंदाने पुढे जाण्याचा वसा त्यांनी कायम जपला आहे.
डॉ. नीलिमा गुंडी यांनी ‘डॉ. स्नेहसुधा यांच्या निवडक कविता’ या कवितासंग्रहातील काही कवितांचे वाचन करून डॉ. कुलकर्णी यांच्या लिखाणात लवचिकता असल्याचे नमूद केले. स्त्रीवादाच्या अनेक धाग्यांमधील एक धागा डॉ. कुलकर्णी यांच्या काव्यात जाणवतो. इतर स्त्रियांच्या व्यथा पाहून, वाचून, ऐकून त्या त्यांनी आपल्या कवितांमधून व्यक्त केल्या आहेत. बदलते स्त्रीजीवन आणि त्यातील प्रश्नही त्यांनी मांडले आहे. संघर्षशिल वृत्तीची लाट वाचकाला त्यांच्या काव्यात जाणवते. त्यांची कविता आत्मकेंद्री होत नाही. आपल्या स्वगतात इतरांचे नि:श्वास ऐकू येणे त्यांच्या कवितेत जाणवते.
डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेवर प्रकाश टाकण्यासाठी लेखिकेने आपली लेखणी उचलली आहे. मध्यमवर्गीय जीवनाचे वास्तव रूप, होणारी ससेहोलपट, कुचंबणा दाखविणाऱ्या कथा जिथे संपतात तिथे वाचकांच्या मनात त्या नव्याने जन्म घेतात.
मान्यवरांचा सत्कार प्रभा सोनवणे, जयराम फगरे, ज्योत्स्ना चांदगुडे यांनी तर परिचय अनुराधा काळे, विश्वास गांगुर्डे, अंजली महाजन यांनी केला. रविप्रकाश कुलकर्णी, डॉ. सुधाकर भोसले, जयराम फगरे, द. दि. पुंडे, राजीव बर्वे, चंद्रकांत शेवाळे, प्रा. रतनलाल सोनग्रा, अविनाश सांगोलेकर आदींचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती सामक यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा जोशी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading