fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

‘अंदाज’ नृत्य महोत्सवाचे उद्घाटन

विविध घराण्यांच्या नयनरम्य कथक नृत्याविष्काराने सुखावले रसिक

पुणे-ः कथक नृत्यातील विविध घराण्यांची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या बंदिशी, तिहाई, तो़डे, परण आणि कजरीसह कथक नृत्यातील पदरचनांचे नयनरम्य अविष्कार पाहून रसिकजन सुखावून गेले.

निमित्त होते पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यसंस्था डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ललित कला केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित ‘अंदाज’ या शास्त्रीय नृत्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे. यानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच एकाचवेळी सादर झालेला विविध घराण्यांच्या कथक नृत्य कलाकारांचा अविष्कार रसिकांना अनुभवता आला.

यावेळी सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका किरण सोनी गुप्ता यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बनारस घरण्याच्या विदुषी जयंती माला, डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीचे प्रमुख आणि पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे शिष्य लखनौ घराण्याचे पं. नंदकिशोर कपोते, चंदीगढ येथील जयपूर घराण्याच्या विदुषी नंदिता पुरी, जयपूर घराण्याचे पद्मश्री पुरू दधिच, रायगड घरण्याचे रामलाल बरेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका किरण सोनी गुप्ता म्हणाल्या की, भारतीय नृत्यकला समृद्ध जीवनशैलीचे द्योतक आहे. ज्यावेळेस जागतिक पातळीवर परंपरांमध्ये तुलना होते तेव्हा कुठला देश प्रगत आहे ते त्या देशाची कला आणि संस्कृती कोणत्या पातळीवर आहे, यावरून त्या देशाच्या प्रगतीचे आडाखे बांधले जातात. भारत हा इतर देशांच्या तुलनेत प्रचंड प्रगत होता. आपली ही समृद्ध परंपरा आहे, ती जतन करणे, त्याच्या पोषणासाठी प्रयत्न करणे, ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करणे या सगळ्याची जबाबदारी आपल्याकडे येते. तळागाळातील कलाकार, उदयोन्मुख कलाकार यांच्यापासून ते यशस्वी कलाकारांपर्यंत या सगळ्या टप्प्यांवरील कलाकारांना पाठींबा देणे आणि त्यांच्या कलेला पोषक वातावरण पुरविणे हे देखील आपले कर्तव्य आहे. चारही घराण्यांचे दिग्गज कलाकार या महोत्सवात त्यांची कला सादर करणार आहेत, हा मोठा दुग्धशर्करा योग आहे. कला आणि संस्कृती हे जगण्याचे साधन आणि अविभाज्य भाग बनले पाहिजे. या महोत्सवात ज्या विविध घराण्यांचे कलाकार कला सादर करणार आहेत ते कलाकार घडण्यामागे त्यांचे परिश्रम आणि त्याग आहे. ते परिश्रम आणि त्यागाचा आपण आदर केला पाहिजे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू शर्मा यांनी केले.

महोत्सवाच्या प्रारंभी पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे शिष्य लखनौ घराण्याचे पं. नंदकिशोर कपोते यांनी कथ्थक नृत्यातील मंदिर परंपरेचा अविष्कार सादर केला. ‘बाजे रे मुरलीया बाजे’ या भजनावरील त्यांचे सादरीकरण रसिकांना गोकुळातील वातावरणात घेऊन गेले. गुरू पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांनी त्यांच्या अखेरच्या काळात शिकवलेल्या बंदिशींचे देखील कपोते यांनी सादरीकरण केले. परमेलू, परण, तोडा, तिहाई अशा बंदिशींच्या प्रकारांनी कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. त्यांना गायनाची साथ पंडित संजय गरूड यांनी केली, तर तबल्यावर कालिनाथ मिश्रा यांनी साथसंगत केली.

त्यानंतर चंदीगढ येथील जयपूर घराण्याच्या विदुषी नंदिता पुरी यांनी प्रारंभी दुर्गा स्तुती सादर करून तीन तालात पारंपारिक नृत्य अविष्काराची अनुभुती दिली. आमद, तुकडे, तोडे, लमछड, परण, कवित तिहाईसह शेवटी अभिनयातून कृष्णाच्या ‘आवत मोरी गलीयो में गिरीधारी’ या गीताला रसिकांची दाद मिळवली.

शेवटच्या टप्प्यात मुंबई येथील कथ्थक क्वीन सीतारा देवी यांच्या कन्या अर्थात बनारस घरण्याच्या विदुषी जयंती माला यांनी प्रारंभी बारा मात्रांमध्ये शिववंदना सादर केली. धमार तालाच्या उत्कट मुद्रा रसिकांच्या मनावर छाप पा़डून गेल्या. पं. सुखदेव महाराज आणि पं. चौबे महाराज यांच्या बंदिशींनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली. त्यानंतर कजरी आणि कथ्थक क्वीन सितारा देवी यांच्या बिजली गतनिकासने कथक नृत्यातील पदरचनांचे महत्त्व अधोरेखित केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading