Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

जगामध्ये अपयशापेक्षा लढून यशस्वी होणा-यांचे प्रमाण अधिक ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त) यांचे मत

पुणे : तरुण पिढी जे कार्य करेल ते समाजासाठी उपयुक्त ठरणारे आहे. तरुणांनी आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे छोट्या छोट्या करण्यासाठी आत्महत्या करणे हा पर्याय असू शकत नाही. निराश न होता ज्याच्यात आवड असेल ते करिअर म्हणून निवडा. जगामध्ये अपयशाचे प्रमाण कमी आहे तर लढून यशस्वी होणा-यांचे प्रमाण अधिक आहे, असे मत ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् आणि डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संस्थेच्या सभागृहात ४ थ्या शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील पोलीस नाईक शैलेश नेहरकर व पोलीस हवालदार लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.  संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, मुकुंद शेवाळे यावेळी उपस्थित होते. शिंदेशाही पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

सुनील लिमये म्हणाले, आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्ञान आत्मसात करा, त्याचा विस्तार करा आणि प्रत्यक्ष कृतीत ते उतरवा. आपल्यातील त्रुटी ओळखा आणि त्यावर मात करा, असे केल्याने तुम्ही कधीही मागे राहणार नाही, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.

शैलेश नेहरकर म्हणाले, आत्महत्या करणा-या युवतीचे प्राण वाचविले त्यासाठी हा शौर्य पुरस्कार देण्यात आला. युवा पिढीने हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की, आत्महत्या हा पर्याय नाही. कोणत्याही गोष्टीचे चिंतन करा, संकटांचा सामना करा. आपल्याला जन्म देणा-या आई वडिलांचा विचार करा, त्यामुळे आत्महत्येचा विचार तुमच्या मनात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लक्ष्मण काशीद म्हणाले, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट च्या वतीने देण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. यापुढेही समाजासाठी चांगले काम करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले,  शहरात झालेल्या छोटया-मोठया आपत्तींमध्ये पोलिसांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना समाज सुरक्षेबाबत देखील अत्यंत जागरुकपणे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading