सारसबाग मित्र मंडळातर्फे भारतीय सैन्यातील ११ सैनिकांचा सन्मान सोहळा
पुणे – भारतमातेचा जयघोष… वंदे मातरम् च्या घोषणा आणि तिरंगा ध्वज हातात घेऊन पुणेकरांनी भारतीय सैन्यातील ११ सैनिकांचा यशोचित सन्मान केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सारसबागेत आयोजित कार्यक्रमात या सैनिकांना अभिवादन करण्यासोबतच राखी बांधण्याकरिता महिलांनी देखील पारंपरिक वेशात गर्दी केली होती.
निमित्त होते, सारसबाग मित्र मंडळ, सैनिक मित्र परिवार व श्री देवदेवेश्वर संस्थानतर्फे सारसबागेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सिमेवरील व प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतलेल्या सैनिकांचा भेटण्याच्या व सन्मानसोहळ्याच्या कार्यक्रमाचे. यावेळी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर याप्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. जयश्री भोसले, वैशाली पाटील, कल्पना खरे, कांचन अण्वेकर, वर्षा सोळंकी, रोहिणी पोतदार, मीना कुलकर्णी, सारिका निकम, कल्याणी सराफ आदींसह सारसबागेत व्यायामाकरिता येणारे देखील मोठया संख्येने उपस्थित होते.
सुभेदार दत्तात्रय मोझर, दत्ताजी झारगे, परशुराम निकम, हवालदार प्रविण खन्ना, संजय नाळे, परशुराम शिंदे, बाबू जाधव, सुभेदार मेजर विजय कुलकर्णी, हवालदार संपत जाधव, कुलभूषण मोरे, शिवाजी पवार, बजरंग निंबाळकर आणि वीरपत्नी दिपाली मोरे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सकाळी सारसबागेतील व्यायाम करणा-यांनी या ११ सैनिकांसोबत सारसबागेत हातात तिरंगा ध्वज घेत प्रभात फेरी देखील काढली. भारतमातेचा जयघोष करित बागेतील उपस्थित अनेकजण या फेरीत सहभागी झाले होते. सैन्यात असताना युद्धात आलेले कठिण प्रसंग आणि सामाजिक जीवनातील अनुभव यावेळी सैनिकांनी कथन केले. महिलांच्या हस्ते सैनिकांना राखी बांधून औक्षण देखील करण्यात आले.
शकुंतला खटावकर म्हणाल्या, प्रत्येक सैनिक हा देशाप्रती आपले कर्तव्य निभावत असतो. मात्र, त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याकरीता आपण सामान्य नागरिकांनी जबाबदारी घ्यायला हवी, हे आपले कर्तव्य आहे. सैनिकांप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासोबतच त्यांच्या कार्याचा आदर्श घेत, नव्या पिढीने सैन्यदलासह इतरही नागरी सेवांमध्ये सहभागी होत देश आणि समाजाची सेवा करायला हवी.
