fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पत्रकारांनी प्रवाहाच्या विरोधात पोहले पाहिजे : अनंत बागाईतकर

पुणे : ज्येष्ठ शोधपत्रकार निरंजन टकले यांनी लिहिलेल्या ‘न्या. लोयांचा खुनी कोण?’या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन १२ ऑगस्ट २०२२ रोजी, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी आणि पुस्तकाचे लेखक निरंजन टकले यांच्या हस्ते झाले. प्रशांत कोठाडिया, रवींद्र माळवदकर, तमन्ना इनामदार, नरेंद्र व्यवहारे व्यासपीठावर उपस्थित होते.

सभागृहात डॉ.कुमार सप्तर्षी, उल्हास पवार,विठ्ठल मणियार, डॉ. सतीश देसाई, अंकुश काकडे,अन्वर राजन,जयदेव गायकवाड, सुनीती सु.र. अरुण खोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

युवक क्रांती दल, संविधानिक राष्ट्रवाद मंच, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदिर, जनसेवा सहयोग कम्युनिटी सेंटर, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप (ट्रस्ट) आणि जय हिंद लोकचळवळ या संस्थांनी संयुक्तपणे या समारंभाचे संयोजन केले . रवींद्र माळवदकर यांनी स्वागत केले. प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. असलम बागवान यांनी आभार मानले.

अनंत बागाईतकर म्हणाले, ‘ माध्यमे ही समाजाचे प्रतिबिंब मांडतात. असत्याच्या गलबल्यातून सत्य शोधणे ही शोध पत्रकारिता आहे. न्या.लोया यांच्या खुनाची चौकशी व्हावी, हीच सत्यशोधनाची मागणी निरंजन टकले यांची आहे. हत्येमागे मोठी व्यक्ती असेल तर गांभीर्य वाढते. लोकशाहीत चौकशीची मागणी अवाजवी नाही. लोया हत्या प्रकरणात नक्कीच पाणी मुरत आहे. दोष समोर आणणे सत्ताधीशांना नको असते. राजसत्तेचे दबाव येतात, आणि कोणी पक्ष त्याला अपवाद नाही. संसदेत आता पत्रकारांना प्रवेशाची बंदी आहे. त्यासंबंधी आम्ही विरोध केला. आता उत्तर प्रदेशातील पोलिस पत्रकारांवर सर्रास खटले दाखल करीत आहेत. पण, पत्रकारांनी प्रवाहाच्या विरोधात पोहले पाहिजे.पत्रकारांप्रमाणे सामाजिक संस्था, नागरिकांनाही लोकशाहीची लढाई लढावी लागणार आहे.मुस्कटदाबी थांबवून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभे राहावे लागणार आहे. सध्याची वाटचाल अराजकतेकडे चालू आहे. सर्वसामान्यांना धाकात ठेवले जात आहे.

निरंजन टकले म्हणाले, ‘ जी बातमी छापून येऊ नये असे कोणाला वाटत असते, तीच शोधणे हे शोधपत्रकाराचे काम आहे. सत्याला वाचा फोडणे, हे शोध पत्रकारितेचे काम आहे.अशा शोधपत्रकारितेला माध्यमात जागा असायला हवी. न्या.ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूचा माध्यमातून पाठपुरावा घेतला गेला नाही. हे पुस्तक लिहिताना मोठे प्रकाशक मागे हटत होते.आयएसबीएन नंबर मिळत नव्हता. तरीही हे पुस्तक प्रकाशित झाले. पुढील पुस्तक सावरकरांवर असेल, आणि ते ‘ अ लॅंब लायनाईज्ड ‘ याच नावाचे असेल. न्या. लोया यांच्या आकस्मित मृत्यूचा शोध घेताना, शोधपत्रकारिता करताना माझा पाठलाग होत होता. शोध पत्रकाराला येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या पर्यायांचा सतत विचार करावा लागतो. जीवावर बेतण्याची शक्यता सतत होती. पुस्तकलेखन म्हणजे जनतेच्या न्यायालयात जाणे होय. मागच्या पिढीला जसं शांत, निर्भय, धर्मनिरपेक्ष वातावरण मिळाले, तसे पुढील पिढीला मिळवून देणे, ही आपली जबाबदारी आहे. द्वेश मूलक कारभार थांबविण्यासाठी देशात वाढलेला विषवृक्ष तोडला पाहिजे, आपण सत्याची कुऱ्हाड उचलली पाहिजे.

संजय सोनवणी म्हणाले, ‘ न्या.लोया यांचा खून झाला, हे वास्तव नाकारता येणार नाही. असत्याचा भडीमार सुरू असताना सत्य शोधून काढण्याची निरंजन टकले यांची धडपड महत्वपूर्ण आहे. प्रश्न फक्त न्या.लोया यांच्या हत्येचा नाही, तर लोकशाहीच्या हत्येचा आहे. इतिहास, अभ्यासक्रम बदलला जात आहे. २०२४ पासून वैदिक संस्कृतीचा खोटा इतिहास शिकवला जाणार आहे. स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करता येईल की नाही ही भीती आहे. आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

निरंजन टकले यांनी मूळ इंग्रजीतून लिहिलेल्या “व्हू किल्ड जज लोया” या पुस्तकाचा श्रीमती मुग्धा धनंजय यांनी मराठीतून अनुवाद केला आहे.

संयोजन समिती तर्फे प्रशांत कोठडिया,संदीप बर्वे,प्रसाद झावरे,रवींद्र माळवदकर ,प्रा. तमन्ना इनामदार, अस्लम बागवान ,नरेंद्र व्यवहारे ,नीलम पंडीत, संकेत मुनोत यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading