fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘हर घर तिरंगा’ अभियानात भाजपाकडून तिरंग्याचा अपमान – नाना पटोले

मुंबई : जुलमी ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यानंतर देश लोकशाही व संविधानाच्या मार्गाने चालत होता पण मागील आठ वर्षापासून लोकशाहीची पायमल्ली केली जात आहे. ब्रिटिश राजवटीत ज्याप्रमाणे सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात त्याच पद्धतीने आज भाजपा सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे आणि जे भाजपाबरोबर जातील त्यांना मात्र वॉशिंग मधून स्वच्छ केले जात आहे, हे दुर्दैवी आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आझादी गौरव पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहभाग घेतला होता. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर आझादी गौरव पदयात्रा काढली जात असून या पदयात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या, त्याग व बलिदान दिलेल्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला स्मरण केले जात आहे तर दुसरीकडे भारतीय जता पक्ष मात्र ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगा झेंड्याचा अवमान करत आहे. चीनमधून हे झेंडे आयात करण्यात आलेले आहेत. या झेंड्याचा आकार व्यवस्थित नाही, मधले चक्र व्यवस्थित नाही तर परभणीमध्ये तिरंगा झेंड्याबरोबर भाजपाने कमळाचे चिन्ह असलेला झेंडा वाटला. भाजपाने तिरंग्याचा कधीच सन्मान केला नाही, त्याला ठेच पोहचवण्याचे काम केले. भाजपाला तिरंग्याचे महत्व माहित नसावे. तिरंगा देशाची शान आहे, करोडो भारतीयांची प्रेरणा आहे पण भाजपाने त्याचा बाजार मांडला आहे. आमचे त्यांना एकच सांगणे आहे की तुम्ही तिरंग्याचा अवमान करू नका.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे. सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी असून हेक्टरी ७५ हजार रुपये मिळावेत ही काँग्रेसची मागणी आहे. नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नियम शिथिल करावेत यासाठी अधिवेशनात आवाज उठवू असेही नाना पटोले म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी नंदूरबार जिल्ह्यातील पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, १९४२ च्या चळवळीनंतर देश पेटून उठला व नंतर १९४७ साली देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधी व काँग्रेसने देशाला काय दिले असा प्रश्न विचारणाऱ्यांना स्वातंत्र्य चळवळीच्यावेळी ते कुठे होते असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, सत्याग्रह, सत्य, अहिंसेची शिकवण दिली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले म्हणून आपण लोकशाही व संविधानाच्या मार्गाने एक राष्ट्र म्हणून उभे आहोत. काँग्रेस पक्ष व काँग्रेसचे नेते पंडित नेहरु, लाल बहाद्दूर शास्त्री, इंदिराजी, राजीवजी, पी, व्ही. नरहसिंह राव. डॉ. मनमोहनसिंह व सोनियाजी यांच्या कणखर नेतृत्वामुळे देश घडला, या देशाला अखंड ठेवण्याचे काम काँग्रेसने केले, त्यासाठी गांधी कुटुंबाने बलिदानही दिले. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले, समतेचा अधिकार दिला व देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाट उचलला..

नाशिकमधील पदयात्रेत नाना पटोले यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, आमदार हिरामण खोसकर, प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सरचिटणीस व नाशिकचे प्रभारी ब्रिज दत्त, डॉ. हेमलता, प्रदेश सचिव राहुल दिवे, नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शाहू खैरे, बबलू खैरे, सोशल मीडियाचे प्रदेश समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading