टीईटी घोटाळ्याची आता ED कडून चौकशी
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 240 कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे. या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED करणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह 14 जणांना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे व इतर अधिकाऱ्यांना प्रत्येक परीक्षार्थ्यांने तीन ते चार लाख रुपये दिले असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती जवळपास अडीशे कोटीच्या जवळपास गेली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेकडून गैरव्यवहार प्रकरणात विद्यार्थ्यांच्या नावाची जी यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये सिल्लोडचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींचा आणि एक मुलाचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.
