सोशल माध्यमांचा नव्या वाटा शोधण्यासाठी उपयोग करा – रेखा पळशीकर
पुणे : कोरोनाकाळात विद्यार्थी आणि शिक्षकांवर जी परिस्थिती ओढावली होती, ती सर्वांसाठीच अत्यंत कठीण होती. त्याकाळात विद्यार्थांकडून सोशल माध्यमांचा अतिवापर होऊ लागला. सोशल माध्यमांचा वापर नव्या वाटा शोधण्यासाठी करा, असे मत महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रेखा पळशीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागाच्या लक्ष्मी रस्त्यावरील सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्रजी माध्यम शाळा व हुजूरपागा इंग्रजी माध्यम ज्युनिअर कॉलेजच्यावतीने दहावी आणि बारावीच्या (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) यशस्वी विद्यर्थिनींचे अभिनंदन व सन्मान करण्यासाठी संस्थेच्या अमृत महोत्सव सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या मुख्य विश्वस्त उषा वाघ, सचिव वरदेंद्र कट्टी, शाला समिती अध्यक्ष वर्षा गजेंद्रगडकर, सभासद रमाकांत सोनवणी, माजी मुख्य विश्वस्त जयश्री बापट, कात्रज इंग्रजी माध्यम प्राचार्या अर्पिता कुलकर्णी (प्राथमिक), किर्ती पंडित ( माध्यमिक), लक्ष्मी रोड इंग्रजी माध्यम प्राचार्या प्रियदर्शनी पुरोहित आणि पूर्व प्राथमिक समन्वयक सविता अंकइकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रक व पदक देवून सन्मानित केले.
रेखा पळशीकर म्हणाल्या, कोविड काळात सोशल माध्यमांवर नको त्या गोष्टी शोधल्या जाऊ लागल्या. परंतु विद्यार्थ्यांनी या सोशल माध्यमाचा वापर योग्य पद्धतीने केला तर अनेक चांगले मार्ग त्यांच्यासाठी खुले असतील. योग्य वापर केला तर योग्य दिशा मिळेल.
प्रियदर्शनी पुरोहित म्हणाल्या, विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले हेच आम्हा शिक्षकांचे यश असते. कोरोना काळात शिक्षकांना नव्या माध्यमातून शिकवणे जेवढे अवघड होते तेवढेच अवघड विद्यार्थ्यांसाठी देखील होते. परंतु अशा परिस्थितीत देखील घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यींच्या पाठीवर कौतुकाची थाप देता यावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले, असे ही त्यांनी सांगितले.
संस्थेचा इयत्ता दहावीचा १०० टक्के तर बारावीचा ८९.८७ टक्के निकाल लागला. दहावीच्या १८ विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी, ७ विद्यार्थिनींना द्दितीय तर ६ विद्यार्थिनींना तृतीय श्रेणी मिळाली. बारावीच्या सई चौगुले ८३.५ टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळविले असून संस्कृती ठुबे हिला ७८ टक्के आणि शिवांजली कवडे ला ७६.८३ टक्के गुण मिळाले आहेत.
