Tuesday, September 8, 2026
Latest NewsPUNE

मधुमेहाविषयी जाणीव जागृती किशोरवयापासूनच गरजेची; ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांचे मत

पुणे : जीवनशैलीतील अयोग्य बदलांमुळे देशात आणि जगभरात मधुमेह आणि वजनवाढीची समस्या उग्र होत आहे. कमी वयात मधुमेहाची लागण होण्याचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे मधुमेहाविषयी जाणीवजागृती आता किशोरावस्थेपासूनच गरजेची आहे. तंत्रस्नेही युवा पिढीला जी भाषा अवगत आहे, त्या माध्यमातून ही जाणीवजागृती वेगाने व्हावी, असे मत ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डाॅ. संजय गुप्ते व  डाॅ. जयंत नवरंगे यांनी व्यक्त केले.

सुचेता स्वास्थम आयोजित ‘रिइमॅजिनिंग हेल्थ वुईथ द दीक्षित लाईफस्टाईल’ हा विशेष कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. त्यावेळी केलेल्या भाषणात हे मत सदर वैद्यकीय तज्ञांनी मांडले.  यावेळी दीक्षित लाईफस्टाईल चे प्रणेते डाॅ. जगन्नाथ दीक्षित, सुचेता स्वास्थमच्या संस्थापक सुचेता गोडबोले देशपांडे, राहुल देशपांडे व माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात सुचेता स्वास्थमच्या दीक्षित लाईफस्टाईल या उपक्रमाच्या मोबाईल ॲपचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डाॅ. गुप्ते म्हणाले, मधुमेहींची वाढती संख्या आणि कमी वयात मधुमेह ग्रस्त होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. अनुवंशिकतेचे प्रमाण मधुमेहाच्या बाबतीत लक्षणीय असल्याचे सिद्ध झाल्याने अनुवंशिकतेच्या दृष्टीने मधुमेहाचे संशोधन सखोलपणे होणे आवश्यक आहे. जगात काही ठिकाणी अशा संशोधनाला सुरवातही झाली आहे. पूर्वी वयाचा ४० वर्षानंतर तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे अशी मानसिकता होती. परंतु सध्याची परिस्थिती बघता तरुण वयातच याविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे तंत्रस्नेही युवा पिढीसमोर तंत्राधिष्ठित ॲपच्या माध्यमातून मधुमेहाविषयी योग्य माहिती पोहोचवणे नक्कीच स्वागतार्ह आहे. तरुण वयात न्युट्रीजेनोमिक्स चाचण्या करून घेतल्या तर त्या या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरतील, असे मत देखील डॉ. गुप्ते यांनी व्यक्त केले.

तरुण वयातील मुलींमध्ये पीएमओएसची समस्या वेगाने वाढते आहे. ज्यामध्ये शरीरातील अनेक हार्मोन्सचे असंतुलन होणे, चयापचय आणि इन्सुलिन रेझिस्टन्स, अंडाशयाची संप्रेरक निर्मितीमधील भूमिका आदींचा समावेश आहे. सध्या हे प्रमाण १५ ते २० टक्के या दरम्यान आहे. याकडे लक्ष दिले नाही तर ते वाढतच जाईल, याकडे देखील डॉ. गुप्ते यांनी लक्ष वेधले.

डाॅ. नवरंगे यांनी शाळांमधील आरोग्य तपासणीचे धक्कादायक निष्कर्ष मांडले. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी आम्ही सरकारी शाळांमध्ये तपासणीसाठी गेलो की, अशक्तपणा, कमी वजन आणि कुपोषणाचे मुद्दे प्रकर्षाने पुढे येत. परंतु, आता अशा शाळांमध्ये देखील सुमारे १५ ते २० टक्के मुलामुलींमध्ये लठ्ठपणाच्या समस्या दिसत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत दीक्षित लाईफस्टाईल हे मोबाईल ॲप युवा पिढीला वेळीच सावध करण्याचे, त्यांच्या आहारविहारावर लक्ष ठेवण्याचे आणि जाणीवजागृती करण्याचे काम करेल, हे महत्त्वाचे वाटते. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारचे महत्व हे नक्कीच ९५% आहे असे देखील डॉ. नवरंगे यावेळी म्हणाले.

एका अंदाजानुसार देशातील मधुमेह असणाऱ्यांची संख्या सुमारे १२ कोटी आहे असे सांगत डाॅ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, मधुमेह तसेच लठ्ठपणा मुक्त समाजाचे असामान्य स्वप्न बघणारा मी एक सामान्य माणूस आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हा मोबाईल ॲपचा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीक्षित जीवनशैली ही संकल्पना आता ४० हून अधिक देशांमध्ये पोहोचली असून, ॲपच्या माध्यमातून ती युवा पिढीच्या समोर येईल.  या जीवनशैलीचे पालन करण्यात या उपक्रमामुळे सातत्य राखण्यास मदत होईल. तसेच, या  क्षेत्रातील संशोधनासाठी अत्यावश्यक असणारा डेटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. त्यातून संशोधनाला अधिक चालना मिळेल. हा डेटा विश्वसनीय असेल, त्याची अधिकृतता निःसंदिग्ध असेल. दीक्षित लाईफस्टाईलच्या माध्यमातून मधुमेहाविषयी जागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जनसामान्यांमध्ये प्रचारप्रसाराचे कार्यही वेगाने होईल, असे डॉ. दीक्षित यावेळी म्हणाले.

डाॅ. दीक्षित यांनी स्वतःच्या मधुमेहग्रस्त आईच्या अकाली मृत्यूचा यावेळी उल्लेख केला. मी डाॅक्टर व्हावे, हे तिचे स्वप्न मी पूर्ण केले, पण वयाच्या ६५ व्या वर्षी ती मधुमेहाने गेली. तेव्हा दीक्षित लाईफस्टाईल नव्हती, याची खंत वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

सुचेता गोडबोले देशपांडे म्हणाल्या, अनेक गोष्टी उद्यापासून सुरू करू, असा संकल्प बहुतेक आरंभशूर करतात आणि तो ‘उद्या’ कधी उगवत नाही. तो उद्या ‘आजपासून’, मध्ये परिवर्तित करण्यासाठी दीक्षित लाईफस्टाईल ॲप विकसित केले आहे. ॲप हे फक्त तंत्रज्ञान नाही तर डाॅ. दीक्षित यांचे विचार लोकांच्या हातात देण्याचा प्रयत्न आहे. आपले आरोग्य आपल्या हातात – अगदी बोटाच्या टोकावर आहे, हा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीमध्ये आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले हे मोबाइल ॲप भारतातील पहिला एआय आधारित आरोग्य साथीदार आहे. यातून तुमच्या प्रश्नांना मिळणारी उत्तरे ही पूर्णतः  डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या मधुमेह व वजन नियंत्रण यासाठी केलेल्या अभ्यासावर व अनुभवांवर आधारित असतील. हे या उपक्रमाचे एक महत्वाचे वैशिट्य आहे, असे राहुल देशपांडे यांनी नमूद केले.

यावेळी मधुमेहग्रस्त झालेल्या, मात्र दीक्षित लाईफस्टाईल अवलंबिल्याने मधुमेहमुक्त झालेल्या ॲड. संकेत डोंगरे, सुरेश कोकाटे, डाॅ. पूजा नांगरे, डाॅ. रमेश बडे यांनी अनुभवकथन केले. राहुल देशपांडे यांनी आभार मानले. डाॅ. पुष्कर खैर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश चंद्रचूड व त्याच्या साथीदार कलाकारांनी एक चित्तवेधक सांगीतिक कार्यक्रम सादर केला. या सांगीतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध गीतकार डॉ. प्रसाद बिवरे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading